कुंभमेळा आपत्ती निवारणासाठी २६४ कोटींचा प्रस्ताव!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांची अपेक्षित गर्दी लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीची गती वाढवण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विविध विभागांकडून आलेल्या एकूण ४२६ कोटी रुपयांच्या उपाययोजना प्रस्तावांची छाननी केली असून त्यातील २६४ कोटी रुपयांचे प्रस्ताव पात्र ठरवून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिली.  कुंभमेळ्यातील गर्दी, वाहतूक, आरोग्य धोक्यांचा संभाव्य अंदाज यांचा सखोल विचार करून ही प्रस्ताव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून वॉटर टेंडर, रेस्क्यू व्हॅन, रॅपिड इंटरव्हेन्शन व्हेइकल, ६० मीटर वॉटर टॉवर, फायर बाइक्स, फायर फायटिंग रोबोट, हाय-प्रेशर व फ्लोटिंग पंप, लाइफ जॅकेट, बोट, आपत्कालीन दिवे अशा अत्याधुनिक उपकरणांच्या खरेदीला हिरवा कंदील देण्यात आला आहे.

त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या प्रस्तावांमध्ये

  • ओटी व आयसीयू विभाग अद्ययावत करणे
  • वैद्यकीय उपकरणे व औषधसाठा
  • तात्पुरते दवाखाने व मेडिकल कॅम्प
  • रुग्णवाहिका खरेदी
  • पेपरलेस ओपीडी, ट्रॅकिंग सिस्टम, जीपीएस व वॉकी-टॉकी

आदी सुविधांचा समावेश झाला आहे.

कुंभमेळ्यादरम्यान जनसुरक्षा, आपत्कालीन प्रतिसाद क्षमतावाढ आणि व्यवस्थापन कार्यक्षमता वाढण्यासाठी ही साधने अत्यावश्यक असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. यासाठी येत्या सोमवारी (दि. ८) स्थाननिहाय गॅप अ‍ॅनालिसिस कार्यशाळा आयोजित केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कुंभमेळ्यासारख्या जागतिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता व आरोग्य हेच प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे संकेत या निर्णयातून मिळत आहेत.

डिजिटल वायरलेस सेट : पोलिस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अंतर्गत वायरलेस, बीडीडीएस, आपत्कालीन व्यवस्थापन आणि क्विक रिस्पॉन्स टीमसाठी सादर केलेल्या आवश्यकतांमध्ये डिजिटल वायरलेस सेट, रिपीटर्स, अँटेना प्रणाली, बॅटरी, चार्जर्स, पीए सिस्टीम, जनरेटर्स, यूपीएस, नाइट व्हिजन उपकरणे, थर्मल कटर, ड्रोन, फर्स्ट एड किट, शोध दिवे, तंबू, रेस्क्यू उपकरणे आदी अनेक बाबी पात्र मानण्यात आल्या आहेत.

प्रशिक्षणासह मनुष्यबळ पात्रता : कुंभकाळात वापरण्यात येणा-या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर संदर्भातील पोलिस विभागाच्या प्रस्तावांमध्ये नियंत्रण कक्षाचे बांधकाम व अंतर्गत संरचना, व्हिडिओ वॉल, सर्व्हर, स्टोरेज, कमांड अँड कंट्रोल सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म, अ‍ॅनालिटिक्स साधने, आयपी कॅमेरे, एचव्हीएसी प्रणाली, फायर सप्रेशन, केबलिंग, नेटवर्क स्विचेस, प्रशिक्षण व मनुष्यबळ आदी घटकांना पात्रता देण्यात आली आहे. मोठ्या जनसमुदायाच्या पार्श्वभूमीवर वास्तविक वेळेतील समन्वयाकरिता ही सुविधा अत्यावश्यक आहे.

त्र्यंबकेश्वरसाठी बचाव साधने : मोटर ट्रान्सपोर्ट विभागाच्या प्रस्तावांमध्ये डायल ११२ वाहने, रॅपिड इंटरव्हेन्शन वाहने, वॉटर टँकर, तसेच रबर बोट्स व त्यांच्या पूरक साहित्यास पात्रता देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या प्रस्तावांमध्ये लाइफ सेफ्टी उपकरणे, फायर फायटिंग साहित्य, इन्फ्लेटेबल रेस्क्यू साधने, क्राउड मॅनेजमेंट सिस्टम, सिम्युलेशन व्यायाम, मॉक ड्रिल्स व इंसिडेंट रिस्पॉन्स साधने पात्र ठरली आहेत.

बचाव प्रतिसाद यंत्रणा होणार सक्षम : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रस्तावांमध्ये बहु-एजन्सी प्रशिक्षण, स्वयंसेवकांचे प्रशिक्षण, रॅपिड इंटरव्हेन्शन वाहने, रेस्क्यू रोप, पंप, जनरेटर, ड्रोन, थ्रो बॅग, स्ट्रेचर, लाइफ जॅकेट, जनजागृती मोहीम, लाइटनिंग अरेस्टर प्रणाली, उपग्रह फोन रिचार्ज व सीसीटीव्ही फीड्स आदी अनेक घटकांना पात्रता देण्यात आली आहे. ही सर्व तांत्रिक क्षमता प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत बचाव व प्रतिसाद यंत्रणा सक्षम करण्यास सहाय्यभूत ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!