मतदार याद्यांतील त्रुटी दूर होईपर्यंत अंतिम यादी जाहीर करू नये: शिवसेना (शिंदे गट)

नाशिक (प्रतिनीधी): नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या ३१ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी, विसंगती व अनियमितता असल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अचूक आणि त्रुटीमुक्त मतदार यादी तयार होईपर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर करू नये, अशी मागणी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, संपर्कप्रमुख विलास शिंदे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, शिवाजी भोर, सुदाम डेमसे आदी उपस्थित होते.

शिवसेनेने निवेदनात नमूद केले की, प्रारूपमतदार याद्यांमध्ये बोगस मतदार, दुबार नावे, मयत व्यक्तींची नावे न वगळणे, एकाच पत्त्यावर शेकडो नावे, अपूर्ण पत्ते, तसेच इतर विधानसभांतील मतदारांची नावे चुकीने समाविष्ट केल्याचे आढळून आले आहे. कुटुंब एकत्रिकरणातील मोठ्या चुका व प्रभागनिहाय मतदारांची चुकीची नोंद देखील निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला.

२०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंख्या संशयास्पदरीत्या वाढल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. तसेच २०१७ मध्ये मतदान केलेले अनेक मतदार सध्याच्या यादीतून गायब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सर्व त्रुटींचे पुरावे सीडीद्वारे मनपा प्रशासनास सादर करण्यात आल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. त्रुटींची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य दुरुस्त्या करूनच अंतिम मतदार यादी प्रसिध्द करावी, अशी मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!