तपोवनातील वृक्षतोडीप्रकरणी महापालिका बॅकफुटवर; लेआऊटमध्ये बदलाचा विचार

रस्त्यातील धोकादायक वृक्षतोडीसाठी उच्च न्यायालयाची परवानगी मागणार
दरम्यान, शहरातील विविध रस्त्यांच्या मध्यभागी उभे असलेल्या मोठ्या वृक्षांमुळे अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचे मनपा प्रशासनाचे मत आहे. अनेक ठिकाणी झालेल्या अपघातांत नागरिकांचा जीवही गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे धोकादायक वृक्ष हटविण्याच्या कार्यवाहीसाठी उच्च न्यायालयाची परवानगी घेण्याची प्रक्रिया उद्यान विभागाने सुरू केली आहे. यासाठी न्यायालयीन वकील पॅनलला पत्र पाठविण्याची तयारी आहे.

नाशिक (प्रतिनीधी): तपोवन येथे साधुग्राम उभारणीसाठी प्रस्तावित असलेल्या १८२५ वृक्षतोडीविरोधात नाशिककर व पर्यावरणप्रेमी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवत आहेत. आंदोलनाला मिळत असलेल्या वाढत्या जनसमर्थनामुळे तसेच  ९००हून अधिक हरकती महापालिकेकडे प्राप्त झाल्याने प्रशासनाने लेआऊटमध्ये बदल करून वृक्ष वाचविण्याचा पर्याय समोर आणला आहे.

साधुग्रामसाठी राज्य शासनाने १२०० एकर जागेचा प्रस्ताव दिला असून, त्यातील महापालिकेच्या ५४ एकर जागेवर साधुग्राम निर्मितीचा आराखडा होता. या जागेवरील दाट झाडीमधील मोठ्या प्रमाणावर झाडे तोडावी लागणार असल्याने तीव्र विरोध निर्माण झाला होता. यानंतर दाट झाडांच्या भागात मोठी बांधकामे न करता केवळ दुचाकी पार्किंग किंवा छोटे टेंट उभारणे, तर आखाड्यांना मोकळ्या जागेत स्थान देण्याची नवी योजना प्रशासनाने समोर ठेवली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धन शक्य होणार असल्याचा दावा होत आहे.

दरम्यान, या आंदोलनात महत्त्वाची भर म्हणून अभिनेते सयाजी शिंदे, सुखराज तसेच मुंबईतील पर्यावरण संघटना नाशिकमध्ये येऊन सहभागी होणार आहेत. सिंहस्थापूर्वीच या विषयावर मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत असल्याने महापालिका स्पष्टपणे बॅकफुटवर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!