हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात डायलिसिस सुविधा सुरु!

नाशिक मनपाच्या दोन रुग्णालयांत आता रुग्णांना जलदगतीने मिळणार सेवा

नाशिक (प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय आणि द्वारका येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू करण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. मनपा रुग्णालयात ही सेवा नसल्याने रुग्णांना शासनाच्या संदर्भ सेवा रुग्णालयात ताटकळत थांबावे लागते. नव्या सुविधेमुळे रुग्णांना जलदपणे ही सेवा मिळू शकणार आहे.
दोन्ही रुग्णालयांत प्रत्येकी १२ खाटांचे डायलिसिस केंद्र्र उभारण्यात येणार आहे. सध्या शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयात डायलिसिस केंद्र कार्यरत आहे. या ठिकाणी शहर व ग्रामीण भागातील रुग्ण डायलिसिस करण्यासाठी येतात. मनपा रुग्णालयात या प्रकारची सुविधा नसल्याने संदर्भ सेवा रुग्णालयातील केंद्रात मोठी गर्दी होते. रुग्णांना बरीच प्रतीक्षा करावी लागते. मनपाच्या रुग्णालयात डायलिसिस केंद्र कार्यान्वित केल्यास रुग्णांची विभागणी होऊन रुग्णांना लवकर ही सेवा देण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने नाशिक मनपाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १० ते १२ खाटांचे डासलितसस केंद्र करण्याची मागणी राष्ट्रवादीचे (अजित पवार) सरचिटणीस अर्जुन टिळे यांनी निवेदनाद्वारे केली होती. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात सुमारे ७०० चौरस फूट जागा उपलब्ध आहे. या जागेलगत प्रसाधनगृह आहे. या ठिकाणी आवश्यक ते बदल करून केंद्र सुरू करण्यात येईल. तर, नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या तळघरात हे केंद्र कार्यान्वित होईल.
डॉ. झाकीर हुसेन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी १२ खाटांचे डायलिसिस केंद्र उभारण्यात येईल. यंत्रसामग्री, विद्युतीकरण, वैद्यकीय अधिकारी व परिचारिका कक्ष, प्राणवायू यंत्रणेसाठी व्यवस्था आदींसाठी एका केंद्रास दोन कोटी १० लाख रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. या दोन्ही केंद्रांसाठी चार कोटी २० लाख ६९ हजार रुपयांच्या खर्चाला सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!