-
डेंग्यू अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगत संख्या आटोक्यात आणण्याचा कागदोपत्रीच प्रयत्न!
-
ठेकेदार सोडून मनपाने १४४१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई, तब्बल २ लाख ८८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल.
नाशिक (प्रतिनिधी) : शहरात डेंग्यूचा उद्रेक झाला असून, त्यावर नियंत्रण करण्यात अपयश आलेल्या मनपाच्या वैद्यकीय विभागाकडून आता डेंग्यू रुग्णांचे आकडे लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच कारणावरून शहरातील आमदारांनी दोन दिवसांपूर्वी आरोग्य वैद्यकीय विभागाची कानउघडणी करत खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची माहिती येत नसेल तर त्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न केला. ऑगस्ट तिस-या आठवड्यापर्यंत डेंग्यूचे ३०४ रुग्ण आढळून आले होते. तर जानेवारी ते २४ ऑगस्ट या कालावधीपर्यत शहरात ८८० डेंग्यूचे रुग्ण असल्याचे आधी जाहीर करणा-या मनपा वैद्यकीय विभागाने घुमजाव केले आहे. डेंग्यूची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह धरली जात नाही. परंतु, खासगी रुग्णालयांनी १०५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह धरल्यानेच रुग्णांची संख्या ८८० पर्यंत गेल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मनपा वैद्यकीय विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आता ऑगस्टमध्ये ३०४ ऐवजी २१२ बाधित तर जानेवारीपासून आतापर्यंत ७७५ डेंग्यूचे रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा मे महिन्यात शहरात डेंग्यूचे ३९ रुग्ण आढळून आले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात गोविंदनगरमधील ५० वर्षीय रुग्णाचा तापाने मृत्यू झाला. महिनाभरात १५५ बाधित रुग्ण आढळले. त्यानंतर जुलै महिन्यात रुग्णसंख्या ४३४ वर गेली. ऑगस्टच्या तीन आठवड्यात ३०४ बाधित आढळून आले. तर दुसरीकडे प्रशासनाने मात्र संबंधीत आकडेवारी ही ३०४ नसल्याचे स्पष्ट करत आकड्यांची लपवाछपवी सुरू केली आहे.
- ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात १०३ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दुस-या आठवड्यात ४२ रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या १४५ झाली. तिस-या आठवड्यात १५९ रुग्ण आढळल्याने तीन आठवड्यात ३०४ डेंग्यू रूग्ण असल्याची माहिती मनपाच्या वैद्यकीय विभागानेच जाहीर केली. परंतु, आता वैद्यकीय विभागाने रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या १०५ रुग्णांचा डेंग्यू अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगत संख्या आटोक्यात असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
- गंगापूररोडवरील शंकर नगर परिसरातील काही महिलांनी बुधवारी (दि. ४) थेट वैद्यकीय विभाग गाठत औषध फवारणी होत नसल्याची तक्रार केली. म्हणजे पेस्ट कंट्रोलच्या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून योग्य रित्या काम होत नसताना ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करायचे सोडून प्रशासनाकडून मात्र नागरिकांनाच आर्थिक दंड केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डासांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरल्याने मनपाने १४४१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल २ लाख ८८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
