पारंपरिक कार्यक्रमाऐवजी सर्पदंश व बिबट बाबत जनजागृती व्याख्यानाचे आयाेजन!
ओझर (प्रतिनीधी): निफाड तालुक्यातील कोठूरे येथील रहिवासी व नाशिक पुर्व वनविभागाचे निाड वन उद्यानातील आधूनिक बचाव पथकातील कर्मचारी वनसेवक शरद चांदोरे यांचे वडिल कै. दगु सखाराम चांदोरे यांच्या दशक्रिया कार्यक्रम निमित्ताने पारंपारिक कार्यक्रमांना फाटा देत तसेच विधी ऐवजी चांदोरे परिवाराने उपस्थित नागरिकांना साप व सर्पदंश व बिबट प्राण्यांविषयी शास्त्रीय माहितीचा कार्यक्रम घेऊन अनोखी श्रद्धांजली दिली. यासाठी शून्य सर्प दंश जनजागृती अभियान व मानव बिबट सहजीवन जनजागृती अभियान बाबत व्याख्यान घेऊन उपस्थितांचे प्रबोधन करण्यात आले.
निफाड तालुका हा बिबट प्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. निफाड वन उद्यान येथे आधुनिक बचाव पथकातील सदस्य शरद चांदोरे हे नोकरी निमित्ताने तालुक्यातील अनेक गावात बिबटया दिसल्यानंतर नागरिकांनी वनविभागाशी संपर्क केल्यानंतर या भागात पिंजरा लावणे व गस्त घालण्याचे काम करतात. हे काम करत असताना नागरिकांमध्ये वन्य प्राण्यांविषयी अनेक गैरसमज असल्याचे त्यांच्या लक्षात येते. हेच गैरसमज दूर करण्यासाठी नोकरी बरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंगामध्येही जनजागृती करण्यासाठी शरद चांदोरे व त्यांच्या परिवाराने दशक्रियाविधी चा दिवसही सत्कारणी लावण्याचे नियोजन केले.
