नाशिक (प्रतिनीधी): गेल्या १५ दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज माघारीच्या दिवसाकडे लक्ष लागले आहे. यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. बंडखोर, तसेच अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी पक्ष, तसेच उमेदवारांकडून प्रयत्न सुरू आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये येत्या ८ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे. अवकाळी पावसाची शक्यता गृहीत धरून तपोवनातील मोदी मैदान अथवा ठक्कर डोम येथील मोकळ्या मैदानावर ही सभा पार पडणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
४ नोव्हेंबर रोजी माघारी आहे. यानंतर दि. ५ नोव्हेंबरपासून निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून आता प्रचाराची व्यूहरचना आखली जात असून, त्याचाच भाग म्हणून महायुतीकडून नाशिकच्या मैदानात प्रचारासाठी आता पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक स्टार प्रचारक उतरणार आहेत. दि. ५ नोव्हेंबरपासून पंतप्रधान मोदी हे राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. त्याअनुषंगाने नाशिकमध्ये येत्या ८ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा घेण्याची तयारी सुरू आहे. मोदी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी धुळे येथे सभा घेणार आहेत. त्यानंतर नाशिकला सायंकाळी त्यांची सभा होणार आहे.
लोकसभा निवडणुकांवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी आणि १५ मार्च असे दोन वेळा नाशिक दौऱ्यावर आले होते. आता त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा येणार आहेत. भाजपकडून त्यांच्या सभेच्या तयारीच्या अनुषंगाने तपोवन येथील मोदी मैदान की ठक्कर डोम येथील मैदान याबाबत चाचपणी केली जात आहे.
८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची धुळे, नाशिकला होणार सभा
