आ. राहुल ढिकले यांच्यावर पुन्हा धुरा; आ. फरांदेंसह संयुक्त जबाबदारी
नाशिक (प्रतिनिधी): महापालिका निवडणुकीच्या प्रमुख पदावरून आमदार राहुल ढिकले यांना अनपेक्षितपणे हटविल्यानंतर पक्षांतर्गत उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांची दखल घेत भाजपाने अवघ्या २४ तासांत आपला निर्णय फिरवला आहे. आता आमदार ढिकले यांच्यावर पुन्हा निवडणूक प्रमुखपदाची धुरा सोपविण्यात आली असून, आमदार देवयानी फरांदे या देखील त्यांच्या समवेत ही जबाबदारी सांभाळणार आहेत.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून, पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांमधील अंतर्गत मतभेद, धुसफूस व सत्तासमीकरणे आता उघडपणे समोर येऊ लागली आहेत.
भाजपाने निवडणूक तयारीच्या दृष्टीने नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्यावर सुरुवातीला एकहाती जबाबदारी सोपविली होती. मात्र, मखमलाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या व नंतर पुन्हा पक्षात स्थान मिळविलेल्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत ‘अस्मान दाखवू’ असे वक्तव्य केल्यानंतर पक्ष नेतृत्वाने अचानक निर्णय घेत त्यांच्या कडील जबाबदारी काढून घेतली होती.
या निर्णयामुळे आमदार ढिकले यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्याचे पडसाद पक्षांतर्गत चर्चांमध्ये उमटू लागल्याने भाजपामध्ये अंतर्गत मतभेद वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेत पक्ष नेतृत्वाने अवघ्या एका दिवसात निर्णय बदलत आमदार ढिकले यांना पुन्हा जबाबदारी दिली आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी याबाबत माहिती देताना, “महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आमदार राहुल ढिकले व आमदार देवयानी फरांदे या दोघांवर संयुक्तपणे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे,” असे स्पष्ट केले.
या निर्णयामुळे भाजपातील अंतर्गत नाराजी काही अंशी शमण्याची शक्यता असून, आगामी काळात महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप अधिक आक्रमक तयारी करताना दिसणार आहे.
