इगतपुरी नगरपरिषदेत ऐतिहासिक सत्तांतर; ३० वर्षांची राजवट संपुष्टात

आज झालेल्या मतमोजणीत नगरपरिषदेच्या १० प्रभागांतील २१ नगरसेवकपदांचे निकालही स्पष्ट झाले. यात राष्ट्रवादी काँग्रेस (अप) आघाडीवर राहिली असून तिला १३ जागा मिळाल्या. शिवसेना (शिंदे गट) ने ५ जागांवर विजय मिळवला, तर भाजप ला २, आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला १ जागा मिळाली. विशेष म्हणजे इंदिरा काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही.

तीस वर्षांपासून इगतपुरीच्या राजकारणात प्रभाव राखणारे संजय इंदुलकर यांना यावेळी मतदारांनी जोरदार धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे मंगेश शिरोळे यांनी इंदुलकर यांचा पराभव करत सत्तांतराची ठोस नांदी दिली. याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांनीही दणदणीत विजय नोंदवला. तसेच मंगेश शिरोळे व भारती शिरोळे हे पती–पत्नी दोघेही विजयी ठरल्याने शहरात राजकीय चर्चेला वेग आला आहे.

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते व समर्थकांनी शहरात जल्लोष केला. फटाके फोडून, एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. मतदारांनी विकास, बदल आणि नव्या नेतृत्वाला संधी देत स्पष्ट संदेश दिल्याचे या निकालातून दिसून आले आहे.

थेट नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदांच्या निकालांमुळे इगतपुरी नगरपरिषदेच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, येत्या काळात शहराच्या विकासाच्या दिशेने कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!