नाशिक (प्रतिनिधी): वाईटावर चांगल्याचा विजय आणि दुष्ट प्रवृत्तीचे दहन करण्याचे प्रतीक असलेला होळी सण नाशिक शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी होळीचे दहन झाल्यानंतर सुवासिनींनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीची पूजा केली. यानिमित्त होळीभोवती रांगोळ्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गोवऱ्यांची अन् उसाची केलेली आकर्षक मांडणी, खोबऱ्याचे तोरण,
हारकड्यांची माळ, लहानग्यांपासून ज्येष्ठांमध्ये ओसंडून वाहणारा उत्साह,
पुरणपोळीचा गोडवा अन् मंत्रोच्चारात पार पडलेले विधी, अशा चैतन्यपूर्ण
वातावरणात शहर व परिसरात होळी सण साजरा करण्यात आला.
ग्रामीण भागासह शहर परिसरात, सोसायट्यांसमोर होळी साजरी करण्यात आली. याशिवाय मखमलाबाद नाका, रामकुंड, रोकडोबा मित्रमंडळ, सरदार चौक, रविवार कारंजा, उपनगरांमधील ठिकाणी होळीचा उत्सव साजरा झाला.
आज वीरांची मिरवणूक
होळीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. १४) वीरांची मिरवणूक निघणार आहे. अनेक पिढ्यांची परंपरा असलेल्या यावर्षीच्या मिरवणुकीत दाजिबा वीराचा मान जुन्या नाशिकमधील विनोद बेलगावकर यांना मिळाला आहे. दाजिबा वीराची मिरवणूक महत्त्वाची मानली जाते. आपल्या इच्छा, समस्या दाजिबा महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी लोक बाशिंग, पाळणा व नारळ मिरवणुकीत अर्पण करतात. श्री दाजिबा महाराज यांचे मूळ स्थान दिंडोरी तालुक्यातील तळेगाव – आक्राळे फाटा येथे आहे. साधारणतः पाच ते सहा पिढ्यांची परंपरा असलेल्या या दाजिबा वीराच्या मिरवणुकीची सुरुवात स्व. पुंजाजी भागवत व स्व. दत्तात्रय गोपाळभा गवत यांनी केली.
