अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सिमा हिरे यांची मागणी!
नवीन नाशिक (प्रतिनिधी): कुंभमेळा आता अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपला आहे. कुंभमेळ्यासाठी देशभरातून रोज हजारो वाहनांमधून लाखो भाविक नाशिक नगरीत येणार आहे. कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी शासनाने निओ मेट्रो, ड्रायपोर्ट, नाशिक-पुणे लोहमार्ग, शिवसृष्टी या प्रस्तावित प्रकल्पांसाठी भरीव निधीची तरतूद करून प्रकल्प मार्गी लावावे, तसेच सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आ. सीमा हिरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.
आ. सीमा हिरे म्हणाल्या, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना कुंभमेळ्यासाठी करावयाच्या विकासकामांचा अनुभव आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकचे देशभरात ब्रँडिंग होणार असल्याने शहराच्या अंतर्गत वाहतुकीसाठी नियोजित असलेली निओ मेट्रो, शेतक-यांचा शेतीमाल मुंबईत नेण्यासाठी ड्रायपोर्ट, नाशिक-पुणे लोहमार्ग, भाविक आणि पर्यटकांच्या पसंतीला उतरू पाहणा-या शिवसृष्टी प्रकल्प, जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा नदीजोड प्रकल्प या प्रस्तावित प्रकल्पांसाठी भरीव निधीची तातडीने तरतूद करून प्रकल्प मार्गी लावावे, अशी मागणी आ. सीमा हिरे यांनी अधिवेशनात केली. या बरोबरच शासनाने यापूर्वी सिडकोतील घरे फ्री होल्ड करण्याच्या केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करणे, तुटपुंज्या मानधनावर शहरातील महापालिका अंतर्गत काम करणा-या अंगणवाडी सेविकेच्या मानधनात वाढ करणे, नागपूर अधिवेशनात घोषणा केलेल्या आयटी पार्कच्या कामाला गती द्यावी, कामगारांसाठीचे ईएसआय हॉस्पिटल सर्व सोयी-सुविधांनी सज्ज करावे, सिडकोवासीयांसाठी शंभर खाटांच्या हॉस्पिटलची उभारणी करणे आदी मागण्यांचे मुद्दे आमदार हिरे यांनी मांडले.
