नाशिक (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत समाविष्ट असलेल्या तपोवन येथील प्रस्तावित वृक्षतोड प्रकरणावरून शहरात तसेच राज्यभरात मोठे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांनी या निर्णयाचा जोरदार विरोध सुरू केला असताना आता या वादात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही उडी घेतली असून त्यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
महापालिकेने तपोवन परिसरातील काही झाडांवर चिन्हांकित करून कुंभमेळ्याच्या कामांसाठी ती झाडे तोडण्याची तयारी सुरू केली होती. मात्र याला विविध पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांनी विरोध दर्शवित आंदोलन उभारले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात हिंदू संघटनाही आक्रमक झाल्या असून, महापालिकेने खूण केलेल्या झाडांवर या संघटनांनी “जय श्रीराम”, “जय हनुमान” अशी अक्षरे लिहून त्या झाडांना शेंदूर लावला आहे. “ही झाडे आम्ही तोडू देणार नाही” असा स्पष्ट इशाराही संघटनांनी दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाठिंबा घोषित करत “एकही झाड तोडू देणार नाही” अशी भूमिका घेतली होती. यावेळी त्यांनी कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंविषयी वादग्रस्त विधान केल्याने वातावरण आणखी चिघळले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सयाजी शिंदेंना धारेवर धरले. सदावर्ते म्हणाले, “तपोवन हे साधू-संतांसाठी आहे. एक कलाकार म्हणून या कामात अडथळा आणणे योग्य नाही. आले किती आणि गेले किती! सयाजी शिंदेंनी चिंतन करावे. स्क्रिप्टवर जगणे थांबवा, टर-टर करू नये,” अशा शब्दांत त्यांनी शिंदेंवर घणाघात केला. तसेच त्यांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन यांची पाठराखण करत कौतुक केले. “गिरीश महाजन यांची गॅरंटी आहे की एकही झाड तुटणार नाही,” असे सदावर्ते म्हणाले. तपोवनातील वृक्षतोडीचा निर्णय, त्यावरून पेटलेला वाद आणि राजकीय-समाजिक आरोप-प्रत्यारोप यामुळे हे प्रकरण पुढील काळात अजून अधिक गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.
