नाशिक (प्रतिनिधी): पतीचे बनावट मृत्युपत्र बनवत जमिनीचे खोटे दस्तावेज दाखवून एका ७० वर्षीय वृद्धेची जमीन बळकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात मुंबई नाका पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लता हेमेंद्र बटाविया (वय ७०, रा. गोविंदनगर) यांचे नाशिक महानगरपालिका हद्दीतील तिडके कॉलनी येथे ०.३० आर हेक्टर क्षेत्र आहे. त्याचे बनावट दस्तावेज तयार करत त्यांच्या पतीचे खोटे मृत्युपत्र बनवून ही जागा आपल्या नावावर करण्यासाठी सहा जणांनी लता बटाविया यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी लता बटाविया यांनी विशाल विलास साळवे व रत्नाकर अनंत कुलथे (रा. जय भवानी रोड, नाशिकरोड), प्रणील दशरथ कटारे (रा. वृंदावननगर), डॉ. केशव डी. माजमुळे, जयंता अशोक नागमोती व फिरदोश शेख या सहा जणांविरोधात मुंबई नाका पोलिसांत खोटे दस्तावेज दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
