डीप फेक आणि AI वर आधारित गुन्हे: वाढता धोका आणि संरक्षण!

AI तंत्रज्ञान एक शक्तिशाली साधन आहे, परंतु त्याचा गैरवापर रोखणे आवश्यक आहे. व्यक्तीगत स्तरावर जागरूकता आणि सतर्कता बाळगणे, तसेच कायदेशीर आणि तंत्रज्ञानाच्या स्तरावर कडक नियमावली तयार करणे, हेच डीपफेक आणि AI आधारित गुन्ह्यांचा वाढता धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

लेखिका: काउन्सिलर – मीनाक्षी जगदाळे, 976686344

गे ल्या काही वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आणि विशेषत डीपफेक (Deepfake) तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. एका बाजूला AI मुळे आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा अनेक क्षेत्रांत नवनवीन संधी निर्माण होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crimes) लक्षणीय वाढ झाली आहे. डीपफेक आणि AI आधारित गुन्हे हे आजच्या डिजिटल युगातील एक मोठे आव्हान बनले आहे.

डीपफेक हा शब्द ‘डीप लर्निंग’ (Deep Learning) आणि ‘फेक’ (Fake) या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. हे एक प्रकारचे सिंथेटिक मीडिया आहे. याचे कार्य लक्षात घेतले असता, डीपफेक तंत्रज्ञान ‘जनरेटिव्ह ॲडव्हर्सेरियल नेटवर्क्स’ (GANs) नावाच्या AI चा वापर करते. याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे फोटो, व्हिडिओ आणि आवाजाचे नमुने घेऊन त्याची हुबेहूब बनावट (Fake) परंतु अत्यंत वास्तववादी (Realistic) प्रतिमा, व्हिडिओ किंवा ऑडिओ तयार केले जातात. आपण अनेकदा राजकीय नेत्यांची भाषणे, काही उच्च पदस्त मोठया लोकांच्या फोटो खाली व्हिडीओ मध्ये रील मध्ये जे काही ऐकतो पाहतो ते याच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेले असते. अनेकदा अश्या लोकांना समाजात बदनाम करण्यासाठी, त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी समाज माध्यमातून असे चुकीचे विडिओ, ऑडिओ, रील्स व्हायरल केले जातात. सर्वसामान्य जनतेला यातील खरे खोटे समजणें सहजासहजी शक्य होत नाही. याचा परिणाम समाजात तेढ निर्माण करणे, राजकीय समीकरण बदलणे, कोणत्याही संवेदनशील विषयाला वेगळे वळण देणे यावर होताना दिसतो. हे बनावट कंटेंट इतके खरे वाटतात की ते मूळ आहेत की बनावट, हे ओळखणे कोणत्याही सामान्य माणसाला जवळजवळ अशक्य होते.

AI आणि डीपफेक आधारित प्रमुख गुन्हे याचा अभ्यास केला असता, समजते की AI आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जात आहे.
त्यातील प्रमुख प्रकार म्हणजेच तोतयागिरी आणि आर्थिक फसवणूक (Impersonation and Financial Fraud) हा होय. गुन्हेगार AI-निर्मित आवाज किंवा व्हिडिओ वापरून पीडितांच्या मित्र, कुटुंबातील सदस्य, किंवा उच्च अधिकाऱ्याची नक्कल करतात.
बनावट आणीबाणी (Emergency) किंवा महत्त्वाच्या वायर ट्रान्सफरची (Wire Transfer) मागणी करून लोकांची आर्थिक फसवणूक करतात. चेहरा किंवा आवाज ओळखण्यावर आधारित सुरक्षा प्रोटोकॉल (Security Protocols) भेदण्यासाठी डीपफेकचा वापर करून बँक खाती हॅक करणे, कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्ड उघडणे शक्य होते.
खंडणी आणि ब्लॅकमेल (Extortion and Blackmail) करण्यासाठी सुद्धा गुन्हेगार याचा आधार घेतात. गुन्हेगार एखाद्या व्यक्तीचे बनावट, तडजोड करणारे किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ/फोटो तयार करतात.
या बनावट कंटेंटचा वापर करून पीडितांना ब्लॅकमेल केले जाते आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जातात किंवा त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करण्यास भाग पाडले जाते.

चुकीची आणि खोटी माहिती पसरवणे (Spreading Disinformation) राजकीय नेते किंवा सार्वजनिक व्यक्ती असे काहीतरी बोलत किंवा करतानाचे डीपफेक व्हिडिओ तयार केले जातात, जे त्यांनी प्रत्यक्षात कधीच केले नसते.
याचा उपयोग प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी, सामाजिक संघर्ष निर्माण करण्यासाठी, किंवा निवडणुकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी केला जातो.
ओळख चोरी (Identity Theft) आणि फेक प्रोफाईल्स लोकांचे ऑनलाइन उपलब्ध असलेले फोटो वापरून AI आणि डीपफेकच्या मदतीने त्यांचे फेक प्रोफाईल्स (Fake Profiles) तयार करणे. या प्रोफाईलचा वापर इतरांची फसवणूक किंवा गैरवर्तन करण्यासाठी केला जातो.

या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? हे जाणून घेणे आजमितीला खूप आवश्यक आहे. AI आधारित गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
सत्यापनावर भर द्या (Verify Everything) फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास, ताबडतोब शंका घ्या. त्यांच्याशी खाजगीरित्या संपर्क साधून स्वतंत्रपणे माहितीची सत्यता तपासा.
डीपफेक व्हिडिओंमध्ये काही विसंगती (Inconsistencies) असतात—जसे की चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांची हालचाल, प्रकाशाची दिशा, किंवा आवाजाची गुणवत्ता. अशा बारीक गोष्टींकडे लक्ष द्या.
वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा (Protect Personal Data)
सोशल मीडियावर तुमचे खूप जास्त वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करणे टाळा. गुन्हेगार याच डेटाचा वापर डीपफेक तयार करण्यासाठी करतात. तुमचे पासवर्ड (Passwords) मजबूत ठेवा आणि शक्य असल्यास टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-Factor Authentication) वापरा.
AI-जनरेटेड कंटेंट ओळखा (Identify AI-Generated Content) केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत की AI च्या मदतीने तयार केलेल्या कोणत्याही कंटेंटसोबत (व्हिडिओ, ऑडिओ, फोटो) तो ‘AI generated’ असा उल्लेख करणे आवश्यक आहे. अशा सूचना असलेल्या कंटेंटवर लगेच विश्वास ठेवू नका.
जागरूक रहा (Stay Aware) डीपफेक आणि सायबर गुन्ह्यांच्या नवीन पद्धतींबद्दल माहिती ठेवा. आपल्यासोबत असा कोणताही गुन्हा झाल्यास काय कराल? हे लक्षात ठेवा. ताबडतोब तक्रार करणे महत्वाचे आहे. सायबर गुन्ह्याची माहिती मिळाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर (National Cyber Crime Reporting Portal- Cybercrime.gov.in) ऑनलाइन तक्रार नोंदवा. यासाठी संपर्क क्रमांक मदतीसाठी १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा.

लिंक: https://cybercrime.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!