देवळाली कॅम्पमध्ये ‘तोपची’ सराव; भारतीय तोफखान्याच्या क्षमतेचे प्रभावी दर्शन

नाशिक : प्रत्यक्ष युद्धभूमीवर उभे राहिल्याचा भास देणारा तोफगोळ्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज, धुराने वेढलेली फायरिंग रेंज आणि अचूक लक्ष्यभेदाची खात्री देणारी अत्याधुनिक निरीक्षण प्रणाली या साऱ्याचा थरारक अनुभव बुधवारी (दि. २१) देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये आयोजित वार्षिक ‘तोपची’ सरावात अनुभवायला मिळाला. भारतीय तोफखान्याची प्रहारक क्षमता, गनर्सचे उच्च दर्जाचे कौशल्य आणि स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाची वाढती ताकद यांचे प्रभावी दर्शन या सरावातून घडले.

देवळाली कॅम्पस्थित तोफखाना स्कूलतर्फे आयोजित या भव्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल मनिश एरी उपस्थित होते. तोफखाना स्कूलचे कमांडंट व तोफखाना रेजिमेंटचे कर्नल कमांडेट लेफ्टनंट जनरल नवनीत सिंह सरना यांच्या नेतृत्वाखाली हा सराव पार पडला.

१५ हजार नागरिक साक्षीदार : या वार्षिक सोहळ्याला सुमारे १५ हजार नागरिकांनी उपस्थिती लावली. ठाणे, सातारा व नाशिकमधील सुमारे चार हजार शालेय विद्यार्थी, संरक्षण सेवा महाविद्यालय व नेपाळ लष्करी सेवा महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी, पुण्यातील संरक्षण तांत्रिक सेवा अभ्यासक्रमातील विद्यार्थी तसेच नेपाळसह भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रणांगणात उतरले स्वदेशी शस्त्रसामर्थ्य : सरावात पिनाका व स्मर्च रॉकेट लाँचर, स्वार्म ड्रोन, लॉयट्रिंग म्युनिशन, प्रगत मानवरहित विमाने यांचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. जवळपास तासभर चाललेल्या या कार्यक्रमात तोफा आणि रॉकेटच्या भीषण भडिमारामुळे फायरिंग रेंज अक्षरशः युद्धभूमीत रूपांतरित झाली.

यामध्ये १२० एमएम मोर्टर, स्वदेशी के-९ वज्र, धनुष, बोफोर्स, हलक्या वजनाची एम-७७७, सोल्टम, इंडियन फिल्ड गन व लाइट फिल्ड गन या तोफांचा समावेश होता. तसेच एकाच वेळी ४० रॉकेट डागण्याची क्षमता असलेले १२२ एमएम मल्टिबॅरल रॉकेट लाँचर व पिनाका प्रणाली यांची ताकद दाखवण्यात आली. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने करण्यात आलेल्या समन्वयित कारवाईने सराव अधिकच प्रभावी ठरला.

काही मिनिटांत तैनाती, निर्णायक प्रहार: बिनतारी संदेश मिळताच काही मिनिटांत तोफा तैनात करण्यात आल्या. एकाच वेळी विविध तोफांमधून सुरू झालेल्या भडिमाराने परिसर धुराने वेढला गेला. मानवरहित विमानांच्या साहाय्याने तोफखान्याच्या माऱ्याचे अचूक निरीक्षण करण्यात आले. टेहळणी व लक्ष्य-निश्चिती विभागाच्या (साटा) आधुनिक उपकरणांची कार्यपद्धती प्रत्यक्ष दाखवण्यात आली. पॅरा ट्रूपर्सचे कसबही उपस्थितांना पाहायला मिळाले.

बीएसएफचा पहिल्यांदाच सहभाग: यंदा सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तोफखान्यासोबत पहिल्यांदाच या सरावात सहभागी झाले. विविध प्रकारच्या ड्रोनद्वारे करण्यात आलेली कामगिरी हे या सरावाचे विशेष आकर्षण ठरले.

स्वदेशी तंत्रज्ञानाची रणांगणावर परीक्षा: के-९ वज्र, धनुष, पिनाका, स्वार्म ड्रोन आणि मानवरहित विमाने यांच्या थेट वापरातून निरीक्षण, लक्ष्य निश्चिती आणि प्रहार यांची संपूर्ण साखळी उभी करण्यात आली. आयात तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता भारत स्वबळावर आपली संरक्षणक्षमता उभारत असल्याचे ठोस चित्र या ‘तोपची’ सरावातून स्पष्टपणे समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!