पेंच ते अंजनेरी: गिधाडाची निसर्गात परतण्याची सफर

ओझर: ११ डिसेंबर रोजी पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर येथून पाठीवर ट्रान्समीटर लावलेले आणि पायात “१३२” नावाने टॅगिंग केलेले लॉंग बिल्ड वल्चर (गिधाड) नाशिकजवळील अंजनेरीसाठी निघाले. १७ दिवसांत हा गिधाड ७०० किलोमीटरचा प्रवास करून आला. परंतु अशक्त अवस्थेमुळे निफाड तालुक्यातील दारणा-सांगवी परिसरात गिधाडाला अडचण आली. ए.आर.इ.ए.एस. फाउंडेशन संस्थेच्या मदतीने वनविभागाने गिधाडाचा रेस्क्यू करून त्याला संरक्षणात घेतले.

गिधाडावर तब्बल २१ दिवस उपचार सुरू राहिले आणि २० जानेवारी रोजी अंजनेरी पर्वतरांगेत तो पुन्हा मुक्त करण्यात आला. उप वनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ येथील टीटीसी येथे २० दिवस रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे पशुवैद्यकीय अधिकारी हेमराज सुखवाल यांनी त्यावर उपचार केले. प्रवासातील थकवा आणि उपासमारीमुळे गिधाडाचे वजन कमी झाले होते तसेच लिव्हरमध्ये इन्फेक्शन झाल्याचे निदान झाले. सुखवाल यांनी सांगितले की, योग्य उपचारानंतर गिधाड पुन्हा निसर्गात सोडण्यास तयार झाला.

मुक्तीसाठी उपस्थित कर्मचारी व संस्थापक:
उप वनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, वनपरीक्षेत्र अधिकारी श्री सुमित निर्मळ, वन परिमंडळ अधिकारी अंजनेरी श्री प्रवीण रत्नपारखे, वनरक्षक अंजनेरी श्री गोविंद काळे, गडरक्षक श्री संजय बदादे, श्री सुरेश निंबेकर, हरी निंबेकर, रेस्क्यू संस्थेचे अभिजित महाले, ऋषिकेश तिवडे, अरुण अय्यर, ए.आर.इ.ए.एस. फाउंडेशनचे संचालक व वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर, किरण पल्हाळ, योगेश शेजवळ, पूजा पगारे, पूनम धांद्रे यांनी सुरक्षित रीतीने गिधाडाला मुक्त केले. गिधाड मुक्त होताच आकाशात भरारी घेऊन घिरट्या घालण्यास सुरुवात केली.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील गिधाड पुनर्वसन उपक्रम

पेंच टायगर रिझर्व, नागपूर येथे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधकांनी बंदिवासात जन्मलेल्या गिधाडांना निसर्गात परत येण्यास प्रशिक्षण दिले आहे. हरियाणातील पिंजोर येथून आणलेल्या १४ गिधाडांना आठ महिने उदरभरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मागील महिन्यात त्यांना जीएसएम टॅग लावले गेले. यात लांब चोचीचे आणि पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचा समावेश होता. या गिधाडांना जंगली गिधाडांसोबत जगण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात ट्रान्समीटर लावून ११ डिसेंबर रोजी मुक्त करण्यात आले. हा प्रकार वन्यजीव संवर्धन आणि पुनर्वसन उपक्रमातला यशस्वी प्रकल्प म्हणून लक्षवेधी ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!