सप्तशृंगगड | प्रतिनिधी : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावरील ‘श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट’च्या कारभाराविरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ट्रस्टच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य बेबीबाई जाधव आणि छगन जाधव यांच्या नेतृत्वाखाली बुधवार (दि. २१ जानेवारी २०२६) पासून गडावर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे मंदिर प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
आंदोलकांनी ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्याचे जीर्णोद्धाराचे काम झाल्यानंतर हिशोबात तब्बल २२ किलो चांदीची तफावत आढळत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. ही चांदी नेमकी कुठे गेली? याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सातवा वेतन आयोग लागू न करणे, कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी नियुक्ती आदेश रोखून धरणे आणि काहींचे पगार विनाकारण अडवून ठेवणे, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, व्यवस्थापनाच्या तणावामुळे आणि छळामुळे काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोपही आंदोलकांनी केला आहे.
१. गाभाऱ्याच्या जीर्णोद्धारातील २२ किलो चांदीच्या तफावतीची सखोल चौकशी व्हावी.
२. ट्रस्टमध्ये झालेल्या सर्व बेकायदेशीर नेमणुका तात्काळ रद्द कराव्यात.
३. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे स्वतंत्र लेखापरीक्षण (Audit) करण्यात यावे.
४. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत.
आंदोलनाची तीव्रता पाहता तहसीलदार तथा विश्वस्त ललित निकम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या तक्रारींच्या निवारणासाठी एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ही समिती सर्व आरोपांची पडताळणी करून पुढील ३० दिवसांत आपला अहवाल सादर करेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
या उपोषणाला गडावरील स्थानिक ग्रामस्थ, कर्मचारी संघटना आणि विविध सामाजिक संस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे. जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार बेबीबाई जाधव यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे सप्तशृंगगड परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून, भाविकांमध्येही या विषयाची मोठी चर्चा सुरू आहे.
