प्रत्येक बालकाचे आरोग्य पत्रिका (हेल्थ कार्ड) तयार करणार : ना. भुसे

नाशिक (प्रतिनीधी): राष्ट्रीय बालस्वास्थ्य उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमात राज्यातील ‍1 ते १८ वर्षे वयोगटातील दोन कोटींपेक्षा अधिक बालकांची सर्वांगीण तपासणी करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य पत्रिका (हेल्थ कार्ड) तयार करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय आरोग्य तपासणी उद्घाटन सोहळा शनिवारी (दि. १) सकाळी महानगरपालिका शाळा क्रमांक ४९, पंचक, जेलरोड येथे आयोजित करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. कार्यक्रमास ना. दादा भुसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण उपस्थित होते.
दादा भुसे म्हणाले की, राष्ट्रीय बालस्वास्थ्य उपक्रम हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. या तपासणीत विद्यार्थ्यात आजार आढळून आला, तर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात येतील. गंभीर विद्यार्थ्याला सर्व योजनांचा लाभ देतल त्याच्यावर उपचार करण्यात येतील. या मोहिमेत कोणताही विद्यार्थी उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी दिली. त्यानंतर राष्ट्रीय बालस्वास्थ्य विभागातर्फे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!