नाशिक (प्रतिनीधी): आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू, नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या ५००३ विद्यार्थ्यांपैकी २१२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही. त्यांना १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी १४ जानेवारीपासून सुरुवात झाली. १४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील १७ हजार ३८५ विद्यार्थ्यांचे आरटीई प्रवेशासाठी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ५००३ विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू, नाशिक जिल्ह्यात २ मार्च अखेर २१२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल्याची माहिती आरटीईच्या संकेतस्थळावरील अहवालातून स्पष्ट होत आहे. आरटीई प्रवेशासाठी निवड झाल्या संदर्भात आणि प्रवेश निश्चित करण्याची माहिती पालकांना दुरध्वनी संदेशाद्वारे दिली जाते. या संदेशाकडे पालकांचे दुर्लक्ष होत असून त्यामुळेच अद्याप काही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाही, असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला. त्यामुळे पालकांना प्रवेशासाठी आणखी वेळ मिळावा, याकरिता प्रवेश घेण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात आरटीईचे २१२९ प्रवेश निश्चित!
