- वन्यजीव सप्ताह निमित्ताने जनजागृती रॅली चे आयोजन
- नाशिक पुर्व वनविभाग व ए.आर.ई.ए.एस. फाउंडेशन चा पुढाकार
ओझर (प्रतिनिधी): कांदा, द्राक्ष पंढरी म्हणून निफाड तालुक्याची ओळख असतांना बिबटयाचा तालुका म्हणून देखील निफाड तालुका कायमच चर्चेत असतो. नेहमीच येथे बिबटया ने हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. यावर उपाय योजना म्हणून नागरिकांमध्ये बिबट प्राण्याबाबत जागृती होण्यासाठी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताह निमित्ताने नाशिक पुर्व वनविभाग व ए.आर.ई.ए.एस. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मानव बिबट सहजीवन जनजागृती मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मानव व वन्यजीव संघर्ष कमी होऊन मानव व वन्यजीव सहजीवनाने जगावे, वन्यजीव अचानक समोर आल्यास काय काळजी घ्यावी, नागरिकांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी जात असतांना शेती परिसर लागला तर काय काळजी घ्यावी या बाबतीत माहिती मिळावी म्हणून नागरिकांमध्ये प्रबोधन व्हावे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.
नाशिक पुर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहायक वन संरक्षक शिवाजी सहाणे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच चांदवड वन परीक्षेत्र अधिकारी एस बी वाघमारे, नांदगाव व येवला वनपरीक्षेत्र अधिकारी सागर ढोले, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मनमाड वनपाल भगवान जाधव यांच्या नियोजना नुसार निफाड येथील शांतीनगर मध्ये असलेले मानव बिबट सहजीवन जागृती केंद्र (निफाड वन उद्यान) येथून वनविभाग पदाधिकारी व ए.आर.ई.ए.एस.फाउंडेशन चे पदाधिकारी, सदस्य, पिंपळगाव महाविद्यालय प्राध्यापक यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.
रॅली निफाड वन उद्यान पासून सुरु होऊन नैताळे, धारणगावं खडक, धारणगावं वीर, खेडलेझुंगे,सारोळे थडी, नांदूरमधमेश्वर मार्गे पुनः निफाड वन उद्यान येथे येऊन समाप्ती झाली. या रॅली द्वारे विविध शाळा, व ग्रामस्थांना भेटी देत बिबट व इतर वन्य प्राण्यांना बाबतीत प्रोजेक्टर व्हॅन द्वारे माहितीपट दाखवण्यात आला व वनविभाग अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच ए.आर.ई.ए.एस. फाउंडेशन चे पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, पालक व गावाकऱ्याशी संवाद साधून माहिती दिली. वाघाची प्रतिकृती असलेला ‘शेरू ‘ रॅलीचा आकर्षण ठरला, रॅली साठी येवला, चांदवड, नांदगाव वनपरीक्षेत्रातील वनाधिकारी व कर्मचारी,ए.आर.ई.ए.एस. फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य, आधुनिक बचाव पथक निफाड व येवला सदस्य,मविप्र संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांचे प्रणिशास्र विभाग प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी, सिडको नाशिक येथील प्रणिशास्र विभाग प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य मधील वन कर्मचारी, पक्षी मित्र, जेष्ठ पक्षी तज्ज्ञ जिल्ह्यातील विविध भागातून आलेले सर्परक्षक, प्रणिमित्र, वन्यजीव छायाचित्रकार व इतर संस्थेचे सदस्य यांनी सहभाग घेतला. रॅली गावात गेल्यानंतर सरपंच व उपसरपंच व ग्रामस्थांनी रॅलीचे जोरदार स्वागत केले व प्रबोधन केल्याबद्दल आभार मानले.