दोन महिन्यांपासून सराव करणारे ढोल पथक आले अडचणीत
नाशिक (प्रतिनिधी): गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या ढोल पथकांच्या वादनावर यंदा पोलिसांकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीत एका ढोल पथकात फक्त ५० वाद्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. याआधी पथकात ८० ते १०० पर्यंत वाद्यांचा समावेश असायचा तसेच त्यावर मर्यादा नव्हती. गणेश मंडळांना कोणत्याही एकाच वाद्याला परवानगी देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. या निर्णयामुळे दोन महिन्यांपासून सराव करणारे ढोल पथक पोलिसांच्या या निर्णयामुळे चांगलेच अडचणीत आले आहे. याबाबत गणेश मंडळांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून मंडळ याबाबत काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
११ दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पांना १७ सप्टेंबर रोजी निरोप दिला जाणार आहे. शहरातील पारंपरिक व मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोल पथकांच्या नियोजनासंदर्भात रविवारी (दि. ८) भद्रकाली पोलिस ठाण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी हे निर्बंध जाहीर केले.
ढोल पथकांसाठी नियमावली अशी
गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी एका ढोल पथकाला ५० पर्यंतच वाद्यांची परवानगी. • मिरवणुकीदरम्यान कोणतेही ढोल, बँजो पथकाने एका ठिकाणी २० मिनिटेच थांबावे. • ढोल पथकाने ३ च्या वर रांगा करू नये, अरुंद ठिकाणी २ रांगा कराव्या. • एका मंडळासोबत एकाच प्रकारच्या वाद्याला परवानगी. • ढोल पथकांसाठी मंडळांनी स्वतंत्रपणे परवानगी घ्यावी
नियम पालन न केल्यास गुन्हे
विसर्जन मिरवणुकीत सहभागी ढोलपथकांना फक्त ५० वाद्य वाजविण्याची परवागनी आहे. तसेच आवाजाच्या मयदिचेही पालन करावे लागणार आहे. नियमपालन न केल्यास मंडळांसह ढोल पथकाविरोधत गुन्हे दाखल केले जातील.
– किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त
सूचनांचे करणार पालन
• ढोल पथकांतील सदस्यांना बैठकीत ५० वाद्य वाजविण्याबाबत सूचना केली आहे. तसेच वादनाबाबत केलेल्या सूचनांचे सर्वच ढोल पथकांकडून पालन केले जाईल. – प्रीतम भामरे, अध्यक्ष, जिल्हा ढोल-ताशा समिती