- युवकांनी शेतीला व्यावसायिक दृष्टिकोनातून बघावे : विलास शिंदे
- युवकांना कृषी क्षेत्रात मोठी संधी : भूषण निकम
लक्ष्मण सोनवणे,
नाशिक/बेलगाव कुऱ्हे (प्रतिनिधी): कृषीप्रधान भारत देशामध्ये कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी प्रचंड मोठी संधी आहे आणि यामध्ये युवकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी आधारित विविध व्यवसायांचा अभ्यास करून स्वयंरोजगार उभे करावेत त्यातून इतर लोकांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल यावर लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशनचे चेअरमन भूषण निकम यांनी केले. तसेच सध्याची परिस्थिती पाहता कृषी पदवीधरही शेती करायला तयार नाहीत परंतु हा दृष्टिकोन बदलायला हवा आता शेतीला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघणे आवश्यक आहे.
शेती क्षेत्रात चांगले काम करेल त्याला नक्कीच संधी आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे खाजगी क्षेत्रात नोकरीच्या संधी कमी होऊ शकतात त्यामुळे तरुणांनी शेती क्षेत्राकडे वळून आधुनिक पद्धतीने आता उत्पादन घेऊन त्यावर न थांबता प्रक्रिया उद्योगाकडे वळावे असे विलास शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नाशिक व दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक कृषी महोत्सव येथे “कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या/उद्योगाच्या संधी” या विषयावर ते बोलत होते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील व्यवसाय करणे शक्य होईल तसेच मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, शेतमाल विक्री, निर्यात या विविध विषयांवर देखील काम करण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी पुढे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सत्कार समारंभ संपन्न झाला. आबासाहेब मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, आणि प्रास्ताविक मध्ये श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र स्वयंरोजगार विभागातून युवक युवती यांना रोजगार देण्यासाठी काय काम करत आहे आणि यामध्ये विविध संधी कशा उपलब्ध आहेत याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर जागतिक कृषी महोत्सवाच्या आयोजक आबासाहेब मोरे, सह्याद्री फार्मर प्रोडूसर कंपनीचे चेअरमन विलास शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, उपसंचालक विलास सोनवणे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडेल अधिकारी जितेंद्र शहा आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रम प्रसंगी विविध कंपन्यांचे प्रमुख व्यवस्थापक यांना निमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या माध्यमातून अनेक युवकांची मुलाखत घेऊन नोकरीची थेट संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.
