“येळकोट यळकोट जय मल्हार” च्या जयघोषात वणी येथे चंपाषष्ठी महोत्सव! 

यात्रा उत्सवातील बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम बघण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी!

वणी (प्रतिनिधी): ग्रामदैवत श्री खंडोबा महाराजांच्या चंपाषष्ठी उत्सवानिमित्त दि. 22 पासून कीर्तनासह अनेक धार्मिक विधींनी संपन्न झाले व आज बुधवार दि. 26 रोजी सायंकाळी भाविकांना विशेष आकर्षण असलेला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वणी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराज मंदिरात यंदा दि. २२ नोव्हेंबरपासून उत्सवाचा शुभारंभ होऊन पाच दिवस धार्मिक विधी, कीर्तन सोहळे आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात दि. २२ ला ह.भ.प. नेहाताई भोसले (भोर), दि. २३ ला निवृत्ती महाराज चव्हाण (ठाणगावकर), दि. २४ ला अमोल महाराज घुगे (अमरावती) आणि सागर महाराज बोराटे (नातेपुते) यांचे कीर्तन झाले. दि. २५ रोजी ह.भ.प. योगेश महाराज जाधव यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता झाली. आज बुधवार दि. 26 रोजी पहाटे श्री मल्हार विजय ग्रंथ पारायणाची सांगता झाली.

 

सकाळी सात वाजता चंदनपूरी येथून कावडीने आणलेल्या जलाने श्री खंडेराव महाराज, म्हाळसा देवी आणि सप्तशृंगी मातांच्या मूर्तींचा जलाभिषेक व पंचामृत महापूजा होणार झाली. दुपारी बारा वाजता खंडेराव-म्हाळसा बानाई यांचा दैवी विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला यावेळी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे, वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्री कुटे, सहाय्यक अभियंता श्री ठेपणे आदींच्या हस्ते महा आरती झाली.

सायंकाळी पाच वाजता श्री मल्हारी मार्तंड रथाची मिरवणूक गावातून निघाली. मिरवणूकीत मंदिराचे पुजारी पुंजाराम पानसरे व बारागाड्या ओढणारे पारंपरिक वेषात सहभागी होऊन गावभर जल्लोष करण्यात आला. मिरवणूक संपल्यानंतर मंदिर प्रांगणात भाविकांना विशेष आकर्षण असलेला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.नंतर श्री खंडोबा महाराजांची महाआरती होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री पंरपरेनुसार जागरण-गोंधळाचा कार्यक्रम झाला. तसेच उद्या गुरुवार दि. 27 रोजी पहाटे लंगर तोडून आरतीने उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती वणी चे उपसरपंच विलास कड यांनी दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खंडेराव महाराज मित्र मंडळ तसेच वणी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!