नाशिक (प्रतिनिधी): नागरिकांचा रस्त्यांवरील खड्डेप्रकरणी रोष असल्याने आधी रस्ते दुरूस्तीची १०० टक्के कामे करा, शासनाकडून निधीची मागणी करा. त्यासाठी आम्हीही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे सांगत शहरातील तिन्ही आमदारांनी मनपा प्रशासनातील अधिका-यांना धारेवर धरले. खड्डे दुरूस्त करताना शासनाच्या ‘एसओपी’चे पालन केले जात नसल्याची बाब आमदारांनी निदर्शनास आणून दिली. कॉलनीअंतर्गत रस्त्यांचे तातडीने प्रस्ताव तयार करून त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी अधिका-यांना दिले.
आमदार अॅड. राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी मनपा मुख्यालय गाठत खड्डेप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली. बांधकाम विभागाच्या अधिका-यांकडून चुकीच्या पद्धतीने उत्तरे दिली जातात, अशा अधिका-यांना आयुक्तांनी अजिबात पाठीशी घालू नये, अशा शब्दात आ. फरांदे यांनी खरडपट्टी काढली. त्यांनी महात्मानगर व गंगापूर रोड भागात काही रस्त्यांची पाहणी करून तेथे चुकीच्या पद्धतीने पॅचवर्क व खड्डे बुजविण्याचे काम झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली. खड्ड्यांबाबतची आकडेवारी निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप करत, जयभवानी रोड आणि जेलरोडचे आ. राहुल ढिकले यांनी उदाहरण दिले. कॉलनीअंतर्गत रस्त्यांचे काय असा सवाल आ. ढिकले व हिरे यांनी उपस्थित करत त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या, अथवा राज्य शासनाकडे निधीची मागणी करा, अशी सूचना केली. त्यावर आयुक्तांनी कॉलनीअंतर्गत रस्त्यांची कामे करण्यासाठी सुमारे ९० कोटी रूपयांची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने अधिका-यांनी प्रस्ताव व प्राकलन तयार करण्याचे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर आदी उपस्थित होते.
नाशिक शहर खड्डेमुक्त न केल्यास येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्याचा इशारा आमदारांनी मनपा प्रशासनाला दिला. मार्गदर्शक सूचनांनुसारच रस्ते दुरूस्तीची कामे करण्याची सूचनाही आमदारांनी केली.
इंदिरानगर भागातील साईनाथ नगर चौफुली ते पुणारोड या रस्त्यावरील वरवरचे अतिक्रमण मनपाकडून काढण्यात आले, मात्र प्रत्यक्ष डीपी रोड तयार करताना त्यात येणा-या अनधिकृत बांधकामांकडे बांधकाम, नगररचना व अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न करत अतिक्रमणधारक तुमचे जावई लागतात का असा सवाल आ. प्रा. फरांदे यांनी केला.
