अॅग्रीस्टॅक हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीचे पाऊल ठरणार!
नाशिक (प्रतिनीधी): केंद्र सरकारतर्फे देशभर अमलात आणण्यात आलेल्या अॅग्रीस्टॅक (शेतकरी ओळख प्रमाणपत्र) या महत्त्वाकांक्षी उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावरील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असला, तरी अजूनही २१ हजार ४६३ शेतकऱ्यांची नोंदणी प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ७ लाख ८४ हजार ७३६ शेतकरी नोंदणीस पात्र आहेत. यापैकी ६ लाख २२ हजार ८४२ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून, ७९.४२ टक्के प्रगती नोंदवली आहे. शिल्लक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे अॅग्रीस्टॅक?
केंद्र सरकारने कृषी क्षेत्र डिजिटल करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून
- प्रत्येक शेतकऱ्याला युनिक आयडी क्रमांक दिला जाणार
- शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध
- जिओ रेफरन्सिंगद्वारे शेतीचे डिजिटल नकाशे तयार
- सर्व कृषी योजनांचे लाभ थेट व वेळेत शेतकऱ्यांपर्यंत
यामुळे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, त्यांची खरी गरज ओळखणे आणि योजनांची पारदर्शक अंमलबजावणी शक्य होणार आहे.
नोंदणी प्रक्रिया कशी?
अॅग्रीस्टॅक नोंदणी १६ डिसेंबर २०२३ पासून सुरू झाली असून ती महसूल व कृषी विभाग संयुक्तरित्या राबवत आहेत.
नोंदणीसाठी :
- शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात भेट द्यावी
किंवा - स्वतः ऑनलाईन नोंदणी करता येईल
युनिक आयडीमुळे शेतजमिनीचे गट क्रमांक ओळखणे अधिक सुलभ होणार आहे, तसेच विविध साहाय्य योजनांचे लाभ देताना होणारी विलंब प्रक्रिया संपुष्टात येईल.
प्रशासनाचे आवाहन : “अजून नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकर नोंदणी करून युनिक क्रमांक मिळवावा. भविष्यातील सर्व कृषी योजना या आयडीशी संलग्न राहणार आहेत.”
हा उपक्रमा का महत्वाचा?
| लाभ | परिणाम | ||
| योजनांचा थेट लाभ | दलालांचा हस्तक्षेप कमी | ||
| पिक माहिती डिजिटल | विमा, अनुदान प्रक्रिया सोपी | ||
| जमिनीचे डिजिटल नकाशे | तंटामुक्ती आणि मालकी अधिकार स्पष्ट | ||
| डेटा-आधारित योजना | शेतकऱ्यांच्या गरजेनुसार निर्णय | ||
पुढील पावले : जिल्हा प्रशासनाने सर्व कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यांना नोंदणी जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिकमधील शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात आघाडीवर असताना अॅग्रीस्टॅक हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीचे पाऊल ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
