जिल्ह्यात महसूल यंत्रणेला बळकटी : ७४ तलाठ्यांना पूर्णवेळ नेमणूक

नाशिक: जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ७४ तलाठ्यांना सोमवारी (दि. १९) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पूर्णवेळ नेमणूक देण्यात आली. या नियुक्त्यांमुळे ग्रामीण भागातील महसुली कामकाज अधिक सुरळीत होणार असून नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यास मोठा मदत होणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गतवर्षी नियुक्त झालेल्या तलाठ्यांनी सहा महिन्यांचे अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने या तलाठ्यांची विविध तालुक्यांमध्ये पदस्थापना करण्यात आली. सुरगाणा तालुक्यातील रिक्त पदांची प्रथम भरपाई करून, उर्वरित तालुक्यांमध्ये रिक्त जागांवर नेमणुका देण्यात आल्या.

या नेमणुकीत अनुसूचित क्षेत्राबाहेरील २५, अनुकंपा तत्त्वावरील १६ आणि इतर क्षेत्रातील ३३ पदांचा समावेश आहे. यामुळे अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांची भरपाई होऊन महसूल विभागातील कामाचा भार कमी होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. याच दिवशी महसूल विभागात अंतर्गत पदोन्नतीद्वारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शिपाई संवर्गातून महसूल सहाय्यक पदावर ७, शिपाई संवर्गातून वाहनचालक पदावर ३, वाहनचालक संवर्गातून महसूल सहाय्यक पदावर १ आणि ग्राम महसूल अधिकारी संवर्गातून मंडळ अधिकारी पदावर ५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्या. एकूण १६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत त्यांना समक्ष बोलावून आदेश प्रदान करण्यात आले. नियुक्तीपत्र वितरणप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारदर्शक, लोकाभिमुख आणि तत्पर प्रशासन देण्याच्या सूचना केल्या. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार (महसूल) आबासाहेब तांबे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तलाठ्यांवरील ताण कमी होणार: जिल्ह्यात सध्या तलाठ्यांची मंजूर संख्या ७०६ आहे. गेल्या काही वर्षांत पदभरती न झाल्यामुळे अनेक तलाठ्यांवर दोन ते तीन गावांचा अतिरिक्त भार होता. नव्याने ७४ तलाठ्यांची पूर्णवेळ नेमणूक झाल्यामुळे महसूल विभागावर असलेला ताण कमी होणार असून, नागरिकांना वेळेत व कार्यक्षम सेवा मिळण्यास मोठा हातभार लागणार आहे. या नेमणुकीतून नाशिक जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला अधिक बळकटी मिळाली असून, प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि तत्परता सुनिश्चित होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!