सटाणा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात इशारा; ३० डिसेंबरपर्यंत काम सुरू न झाल्यास आमरण उपोषण

सटाणा (प्रतिनिधी): सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी ते अर्धवट अवस्थेतच थांबले आहे. परिणामी शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर उडणारी धूळ, ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, अरुंद झालेले रस्ते, सततची वाहतूक कोंडी आणि वाढता अपघातांचा धोका यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे सटाणा शहरातील मुख्य बाजारपेठ, शैक्षणिक संकुले, रुग्णालये व रहिवासी भागात ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे. व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून ग्राहकांची संख्या घटली आहे. पावसाळ्यानंतर रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली असून दुचाकीस्वार, वृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी व महिला यांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे अपघातांचा धोका अधिक वाढला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर साई सावली फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कोठावदे, भाजपाचे बिंदू शर्मा व जे. डी. पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बागलाणचे प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. निवेदनात महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करून ते नियमानुसार, गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यात यावे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे रुग्णवाहिका, शालेय वाहने, अग्निशमन दल तसेच इतर अत्यावश्यक सेवांच्या हालचालींना मोठा अडथळा निर्माण होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण होत असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.  शिष्टमंडळाने प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, दिनांक ३० डिसेंबर २०२५ पर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही, तर नागरिकांच्या वतीने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासन व संबंधित यंत्रणा सर्वस्वी जबाबदार राहतील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सटाणा शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच भविष्यातील विकासासाठी राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे काम केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात तातडीने सुरू करून ते दर्जेदार पद्धतीने व ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावे, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी पंकज सोनवणे, प्रफुल्ल कुवर, नानासाहेब देवरे, राकेश सैंदाणे, यशवंत सोनवणे, भगवान पवार, चेतन सूर्यवंशी, रोहित येवला, सुधाकर पाटील, योगेश पाटील, योगेश सोनवणे, राजू पाटील यांच्यासह अनेक जागरूक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!