नाशिक महापालिका निवडणूक : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ९ जागांवर लढणार

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) एकूण ९ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पक्षाने शहरातील प्रभाग क्रमांक ११, २६, २८, २९ व ३१ या प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार सर्व उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म वितरित करण्यात आले आहेत.

पक्षाच्या निर्णयानुसार प्रभाग ११ मधून माजी नगरसेविका अ‍ॅड. वसुधा कराड या निवडणूक रिंगणात उतरतील. प्रभाग २६ मधून माजी नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे, माजी नगरसेवक सचिन भोरज्योती सचिन घाटोळ व स्वप्न मच्छिंद्र माळी हे चार उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तसेच प्रभाग २८ मधून अ‍ॅड. मनोज आहेर, प्रभाग २९ मधून संतोष मुरलीधर काकडे तर प्रभाग ३१ मधून आत्माराम डावरे व किरण राजभोज हे उमेदवार मैदानात असणार आहेत.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पक्षाने म्हटले आहे की, राज्यात व देशात सुरू असलेल्या विश्वासघातकी, संधीसाधू, स्वार्थी व सातत्याने दल बदल करणाऱ्या राजकारणामुळे सामान्य जनता प्रचंड कंटाळली आहे. सत्ता, पद आणि वैयक्तिक फायद्यासाठी तत्त्वांशी तडजोड करणाऱ्या राजकारणाला पर्याय म्हणून नागरिकांना स्वच्छ, पारदर्शक आणि लोकहिताचे राजकारण हवे आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गेल्या ३० ते ४० वर्षांपासून तत्त्वनिष्ठ राजकारणाची परंपरा जपली आहे. कोणत्याही प्रकारच्या संधीसाधूपणाला किंवा सत्तालोलुपतेला थारा न देता, पक्षाने सातत्याने कामगार, कष्टकरी, शेतकरी, महिला व दुर्बल घटकांच्या प्रश्नांवर संघर्षात्मक भूमिका घेतली आहे. या निवडणुकीत पक्षाने २५ वर्षांहून अधिक काळ समाजसेवा, आंदोलन आणि जनहिताच्या लढ्यांत कार्यरत असलेल्या अनुभवी कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली आहे, असेही पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

महापालिकेच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, घरकुल योजना, झोपडपट्टी पुनर्वसन, कामगारांचे प्रश्न व नागरी सुविधांमधील अनागोंदी यावर ठोस भूमिका मांडत संघर्ष करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. केवळ घोषणांपुरते नव्हे, तर रस्त्यावर उतरून जनतेसाठी लढणारे प्रतिनिधी देणे हा पक्षाचा उद्देश आहे. नाशिकमधील सुज्ञ व जागरूक जनता या निवडणुकीत तत्त्वनिष्ठ आणि जनतेच्या बाजूने उभ्या असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला निश्चितच यशस्वी करेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

— डॉ. डी. एल. कराड, राज्य सचिव मंडळ सदस्य,
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!