- अवकाळी अनुदान यादीत मोठा घोळ; शेतकऱ्यांचा आरोप
- ग्रामसेवकांकडून उडवाउडवीची उत्तरे, शेतकरी आक्रमक
तुषार रौंदळ
सटाणा (प्रतिनिधी):
बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीच्या अनुदान यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. ग्रामसेवकांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. त्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तळवाडे दिगर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात पंचनामे करण्यात आले. मात्र शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अनुदान यादीत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त क्षेत्र आणि दाखविण्यात आलेले क्षेत्र यामध्ये मोठी तफावत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाले असता, संबंधित ग्रामसेवकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पाण्याच्या टाकीवर चढून निषेध आंदोलन सुरू केले. ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या जवळच्या काही शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावर संपूर्ण क्षेत्र, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र दाखवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. मात्र उर्वरित बहुतांश शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष क्षेत्र आणि नुकसानग्रस्त दाखवलेले क्षेत्र यामध्ये मोठी तफावत असून जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
या प्रकरणात सदोष पंचनामे व यादी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांच्याकडे केली. त्यानंतर गावातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने लेखी निवेदन ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांना देण्यात आले.
दरम्यान, बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दूरध्वनीवरून शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, अनुदान यादीतील त्रुटींची चौकशी करून योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल व सर्व शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवरील आंदोलन मागे घेतले. संबंधित निवेदन तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडेही सादर करण्यात आले.
पंचनाम्याचे अधिकार तलाठी कार्यालयाला द्यावेत
यापुढे गावात होणाऱ्या कोणत्याही शेती नुकसानीच्या पंचनाम्याचे सर्वाधिकार ग्रामपंचायतीऐवजी थेट तलाठी कार्यालयास द्यावेत, अशी मागणीही शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे.
“माझ्या नावावर दोन हेक्टर क्षेत्र असून पंचनामा फॉर्ममध्ये तेवढेच क्षेत्र दाखवले होते. मात्र केवायसी यादीत माझ्या नावापुढे केवळ ३७ आर क्षेत्र दाखवण्यात आले आहे. शासनाने याची दखल घेऊन मला न्याय द्यावा.”
— प्रदीप पवार, शेतकरी
