कंधाण्यातील भागडा डोंगराला आग; वेळेवर नियंत्रण, युवक–वनकर्मचाऱ्यांचे धाडस मोलाचे

सटाणा (प्रतिनिधी) : कंधाणे (ता. बागलाण) येथील भागडा डोंगराच्या माथ्यालगत बुधवारी (दि. २४) रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. रात्रीच्या सुमारास डोंगराच्या वरच्या भागात भडकलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच सटाणा वनपरिक्षेत्राचे आग नियंत्रण पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, स्थानिक युवकांनीही कोणतीही सूचना न देता स्वयंस्फूर्तीने मदतीसाठी धाव घेतली. सलग दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, त्यामुळे मोठी वनहानी टळली.

प्राथमिक अंदाजानुसार अज्ञात माथेफिरूने डोंगराच्या माथ्यावर जाणूनबुजून आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रात्रीचा कीर्र अंधार, भडक ज्वाळा, उताराचा कठीण भूभाग आणि विषारी जिवांचा धोका असूनही युवक व वनकर्मचारी वर्गाने जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणली. पाण्याची कमतरता, वाऱ्याचा वेग आणि दाट झुडुपे यांमुळे आग नियंत्रणात आणणे आव्हानात्मक ठरत होते. मात्र समन्वयाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे आगीचा फैलाव रोखण्यात यश आले.

भागडा डोंगर परिसरात यापूर्वीही आगीच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षात दोन वेळा येथे आग लागली होती. त्या वेळीही स्थानिक युवकांनी पुढाकार घेत वनसंपदेचे रक्षण केले होते. सातत्याने होणाऱ्या अशा घटनांमुळे वनसंपदेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक वनसमिती व ग्रामस्थांकडून होत आहे.

या आग नियंत्रण मोहिमेत वनपाल सुदाम पवार, वनरक्षक माणिक वाघ, वनमजूर रवी सोनवणे, केदा सोनवणे व शरद खैरनार यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच स्थानिक युवकांचे सहकार्य निर्णायक ठरले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, भागडा डोंगर परिसरात सुमारे वीस वर्षांपूर्वी युवकांच्या सक्रिय सहभागातून वनसंवर्धन मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांना कुऱ्हाड व चराई बंदीची शपथ देत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. त्या संवर्धन प्रयत्नांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, वनआगी रोखण्यासाठी जनजागृती, नियमित गस्त आणि कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!