नाशिक (प्रतिनिधी): महाविकास आघाडीत मात्र काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षांकडून उमेदवारांची नावे अखेरच्या क्षणी जाहीर करण्यात आल्याने एबी फॉर्मचे वितरण उशिरा झाले. परिणामी उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी दमछाक झाली.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ७, १२, २४ व २८ मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मंगळवारी (ता. ३०) प्रचंड गर्दी झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू होती. अंतिम दिवशी चारही प्रभागांतून १०५ अर्ज दाखल झाले असून, एकूण अर्जांची संख्या १९७ इतकी झाली असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात मंगळवारी अर्ज भरण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या पक्षांचे उमेदवार अंतिम दिवशी केवळ पक्षाचे एबी फॉर्म जमा करण्यासाठी कार्यालयात दाखल झाले.
निवडणुकीसाठी भाजपकडून शिवाजी गांगुर्डे, सुरेश पाटील, हिमगौरी आडके, शिवसेनेकडून अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सीमा ठाकरे, शिवसेना (उबाठा) पक्षाकडून शिवानी पांडे, मनसेकडून सत्यम खंडाळे व सुजाता डेरे, तर अपक्ष म्हणून किशोर घाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता.
प्रभाग ७ मध्ये मैत्रीपूर्ण लढत
शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजप व शिवसेनेने चारही जागांसाठी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीत मनसेकडून तीन इच्छुक असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा एक उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडीची शक्यता निर्माण झाली असून ‘ब’ गटात आघाडीचा उमेदवार नसल्याचे चित्र आहे.
प्रभाग १२ मध्ये तिरंगी लढतीची शक्यता
प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपने तीन नवख्या उमेदवारांसह एका माजी नगरसेवकाला उमेदवारी दिली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस येथे प्रत्येकी दोन जागांवर लढत आहेत. महाविकास आघाडीत चार जागांसाठी पाच इच्छुक असून शिवसेना (उबाठा) व मनसेकडून प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तसेच ‘ब’ गटातून मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने आघाडीत पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
