- एक जागा – दोन उमेदवार; शिस्तीच्या पक्षाचा मुखवटा गळाला
- भाजपच्या उमेदवारीत गोंधळ, गटबाजी उघड; नेतृत्व नियंत्रण हरपल्याची चर्चा
नाशिक (प्रतिनीधी) : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपची उमेदवारी प्रक्रिया अक्षरशः कोसळली असून, एकाच जागेसाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म मिळाल्याच्या धक्कादायक प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘शिस्त, संघटन आणि नियोजन’ यांचा गवगवा करणाऱ्या भाजपमध्येच गोंधळ, गटबाजी आणि सत्ताकेंद्रांचा संघर्ष उघड झाल्याने पक्षाची प्रतिमा गंभीर अडचणीत आली आहे.
प्रभाग क्रमांक २४ ‘अ’ मध्ये पक्षाच्या अधिकृत यादीत नाव असतानाही सुरेखा नेरकर यांचा अर्ज अपक्ष ठरणे, तर आधी अर्ज दाखल केल्याने पल्लवी गणोरे यांचा अर्ज वैध ठरणे, हा प्रकार भाजपच्या अधिकृत निर्णयांनाच केराची टोपली दाखवणारा ठरला. पक्षाचा आदेश मोठा की एबी फॉर्म? असा सवाल कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे विचारला जात आहे.
सिडकोतील प्रभाग क्रमांक २६ ‘क’ मध्ये तर उमेदवारीवरून झालेला वाद थेट निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचला. अधिकृत यादीतील पुष्पावती पवार यांचा अर्ज अवैध ठरणे आणि आधी अर्ज दाखल केल्याने अलका अहिरे यांचा अर्ज वैध ठरणे, हा प्रकार म्हणजे भाजपमध्ये “पहिला येईल तो राजा” अशी स्थिती असल्याचे स्पष्ट संकेत देतो.
प्रभाग क्रमांक २९ ‘अ’ मध्ये भाजपची अंतर्गत गटबाजी अधिकच ठळक झाली. अधिकृत यादीतील मुकेश शहाणे यांना बाजूला सारत, एबी फॉर्मसह दीपक बडगुजर मैदानात उतरल्याने दबावाचे राजकारण आणि घराणेशाही पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. उशिरापर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर शहाणे यांचा अर्ज अवैध ठरणे, हा निर्णय राजकीय वजनावर आधारित असल्याची जोरदार चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक २५ मध्ये तर एकाच कुटुंबातील तीन उमेदवारांसह चार उमेदवार भाजपतर्फे वैध ठरणे, हा प्रकार भाजपच्या संघटनात्मक शिस्तीची पूर्णपणे पोलखोल करणारा ठरला आहे. त्याचवेळी पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेल्या संगीता पाटील व भाग्यश्री ढोमसे यांचे अर्ज अवैध ठरणे म्हणजे नियोजनातील गोंधळाचे जिवंत उदाहरण मानले जात आहे. दरम्यान, “एकही एबी फॉर्म गायब नाही; सर्व फॉर्म अध्यक्षांकडेच होते,” असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले असले, तरी मग अधिकृत यादीबाहेरील उमेदवारांच्या हातात एबी फॉर्म आले कुठून? हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. अध्यक्षांकडे फॉर्म असताना, चुकीच्या उमेदवारांपर्यंत ते पोहोचलेच कसे, याचे उत्तर भाजप नेतृत्वाकडे नाही. या साऱ्या प्रकारामुळे भाजपमधील गटबाजी, निर्णयशून्यता आणि नेतृत्व अपयश पहिल्यांदाच इतक्या उघडपणे समोर आले आहे. निवडणुकीआधीच उमेदवारीवरून उडालेला हा गोंधळ मतविभाजन, बंडखोरी आणि थेट पराभवाला कारणीभूत ठरेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
