शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. शेतकरी कर्जमाफीमध्ये दोन गट आहेत. त्यातील एक गट सातत्याने कर्ज भरतो. मग आमच्यावर अन्याय का? अशी त्यांची भावना आहे. तर दुसरा गट हा थकबाकीदारांचा आहे. याविषयी सरकार योग्य निर्णय घेईल. हा विषय माझ्या आखत्यारित येत नसल्याचेही अॅड. कोकाटे यांनी स्पष्ट केले.
नाशिक (प्रतिनिधी): आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा बँकेतर्फे सुरू असलेल्या कर्जवसूली मोहिमेचे समर्थन करीत बँकेच्या कर्जवाटपात अनियमतता झाली असेल, तर दोषींवर कारवाई व्हायलाच हवी. त्यात माजी संचालक असतील किंवा भलेही मी जरी दोषी आढळलो तरी माझ्या विरोधातही गुन्हा दाखल करा, अशी स्पष्ट भूमिका कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी मांडली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत असल्यामुळे बँकेने कर्जवसुली मोहीम हाती घेतली आहे. याबाबत रविवारी (दि.१२) बोलताना मंत्री अॅड. कोकाटे म्हणाले, जिल्हा बँकेकडे पैसे नसल्यामुळे ठेवीदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, शेतकरी कर्ज भरत नसून उलट ही कारवाईच थांबवावी, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली. मात्र, कारवाई थांबविणे अवघड आहे. यातून काहीतरी कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्जवाटपात दोषी संचालकांवर कारवाई झालीच पाहिजे. अगदी मी त्यात दोषी असेल तर माझ्याविरोधात देखील कारवाई करा असेही अॅड. कोकाटे म्हणाले.
