नाशिक (प्रतिनिधी): कोणाला मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यात महायुतीला बंपर यश मिळाले असून, जिल्ह्यातही महायुतीचाच डंका वाजला आहे. राज्यात महायुतीच्या सत्तेत मंत्रिपदाची लॉटरी नाशिकमधून कोणाला लागणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ व नरहरी झिरवाळ त्याचबरोबर शिवसेनेचे दादा भुसे हे पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. नव्या चेहºयांना संधी देण्याचा विचार झाल्यास विजयाची हॅट्ट्रिक करणारे डॉ. राहुल आहेर, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, अॅड. राहुल ढिकले यांच्याबरोबरच पाच वेळा विधानसभेचा अनुभव असलेले अॅड. माणिकराव कोकाटे यांचेही नाव पुढे आहे. संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात माजी खा. समीर भुजबळ यांना मात देणारे शिवसेनेचे सुहास कांदे यांचे नाव देखील चर्चेत आहे.
राज्यात महायुतीच्या पारड्यात मतदारांनी भरभरून यश टाकले असून, यात नाशिकचाही खारीचा वाटा आहे. महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने देखील चांगल्या जागा मिळविल्या. त्यामुळे जम्बो मंत्रिमंडळ राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिकमधून अनेक जण देव पाण्यात ठेवत आपली दावेदारी करणार आहे. पक्षनिहाय आमदारांच्या संख्येचा विचार केल्यास भाजपकडे सर्वाधिक २१, शिवसेनेकडे १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे १० मंत्रीपदे असा फॉर्म्युला तूर्तास ठरल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीच्या मावळत्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ मंत्री होते. नरहरी झिरवाळ विधानसभेचे उपाध्यक्ष होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी दावा राहील. जिल्ह्यात गतवेळप्रमाणेच शिवसेनेच्या दोनच जागा निवडून आल्या आहेत. मागील सरकारमध्ये दादा भुसे मंत्री होते. त्यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची देखील जबाबदारी होती. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी त्यांचा दावा राहील. गतवेळी एकही मंत्रीपद भाजपकडे नव्हते. त्यामुळे आता मंत्रिपदासाठी स्पर्धा राहणार, असे चित्र आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चांदवड-देवळा येथील जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. राहुल आहेर यांना महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात पहिले स्थान दिले जाईल, असे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे डॉ. आहेर यांचा मंत्रिपदावर दावा राहील. आमदारकीची हॅट्ट्रिक केलेल्या व महिला प्रतिनिधी म्हणून प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांचा देखील मंत्रिपदावर दावा राहील. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून आमदार ढिकले यांच्या गळ्यातदेखील मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तब्बल पाच वेळा विधानसभेच्या सभागृहाचा अनुभव पाठीशी असल्याने अॅड. माणिकराव कोकाटे हेही दावा करू शकतात.