..त्यांचा दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडत पोलिसांकडून तिघे जेरबंद!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड परिसरात हाणामारी करून लुट करणा-या टोळीतील तिघांना पोलिसांनी एका गावठी कट्टयासह ताब्यात घेतले आहे. या टोळीतील आठ संशयित जयभवानी रोडजवळील एका मैदानात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमले असताना पोलिसांनी त्यांच्यापैकी तिघांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी आठ संशयितांविरोधात हत्यार प्रतिबंध कायदांतर्गत उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पसार झालेल्या पाच संशयितांच्या मागावर आहेत.
उपनगर पोलिसांनी शनिवारी (दि. २३) दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, देवळालीमधील जयभवानी रोडवर रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास संशयितांकडून दहा हजार रुपयांचे गावठी पिस्तुल, जिवंत काडतूसे, दोरी, ब्लेड आदी घातक शस्त्रे जप्त केली. स्वप्निल उर्फ भूषण सुनील गोसावी याच्याकडून दहा हजार रुपयांचे पिस्तुल, चारशे रुपयांचे दोन जिवंत काडतूसे, १०० रुपयांचा लाकडी मूठ असलेला एक कोयता व एक धारदार शस्त्र दानिश हबीब शेख याच्या अंगझडतीत सापडले. तसेच बबलू रामधर यादव याच्या अंगझडतीत २० फूट नायलॉनची दोरी आणि दीडशे गॅ्रम मिरची पूड आढळून आली. त्यामुळे संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संशयितांनी या अगोदर दोन दिवसांत दोन घटनांमध्ये रोकड लुटून दोघांना मारहाण केली असून याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दखल घेत गस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर आणि त्यांच्या सहकाºयांना तपासाचे आदेश दिले. पोलीस रात्रीची गस्त घालत असताना पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास जयभवानी रोडवरील शंकुता पेट्रोलपंपजवळील मोकळ्या मैदानात काही संशयित उभे असलेले दिसले. त्यांची चौकशी करण्यासाठी पथक जात असताना पोलिसांना पाहून काही संशयितांनी कारमधून पळ काढला. तर कारच्या बाजुला उभे असलेले काही संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई पंकज कर्पे, सुरज गवळी, संदेश रघतवान यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतूसे, एक लोखंडी कोयता, एक नॉयलॉन दोरी, मिरची पूड असे दरोड्याचे साहित्य हस्तगत केले.
या कारवाईत स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी (वय २३, रा. ओझर), दानिश हबीब शेख (वय २३, रा. विहीतगाव), बबलू रामधर यादव (वय २९, रा. देवळाली गाव) या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर पळून गेलेल्यामध्ये सागर म्हस्के, तुषार पाईकराव, सुरज भालेराव, अनिकेत उर्फ शबºया देवरे, रोहित लोंढे उर्फ भुºया आदी संशयितांचा समावेश आहे. या सर्वांवर भारतीय हत्यार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांनीही दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे कबुल केले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, निरीक्षक संजीव फुलपगारे, सहायक निरीक्षक सुयोग वायकर, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, उपनिरीक्षक सुरेश गवळी, हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, बरेलीकर, सुरज गवळी, संदेश रगतवान, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, सौरभ लोंढे, देवा भिसे, अंमलदार विजय टेमगर, नाना पानसरे, विशाल कुंवर, समाधान वाजे, अजय देशमुख यांनी पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!