उठा उठा सकाळ झाली; मतदानाची वेळ आली!

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील चार हजार ९२६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. मालेगाव बाह्य, बागलाण व इगतपुरी या तीन मतदारसंघांत प्रत्येकी १७ उमेदवार निवडणूक लढत असल्याने तेथे दोन बॅलेट युनिट्सवर मतदान होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा तोफा थंडावल्यानंतर अवघ्या जिल्ह्याचे लक्ष बुधवारी (दि. २०) होणा-या मतदानाकडे लागले आहे. जिल्ह्यातील १५ जागांसाठी १९६ उमेदवार रिंगणात असून, जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान पार पडणार असून, ५० लाख ६१ हजार १८५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
साहित्य वाटप केंद्रावर तिसरे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मतदानासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी ईव्हीएम व मतदान साहित्यासह मंगळवारी (दि. १९) आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी केंद्रांच्या संख्येनुसार १० टक्के राखीव मतदान पथके ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात २४,६१० आणि २४६१ राखीव असे एकूण २७,०७१ कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
पंधराव्या विधानसभेची निवडणूक महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैºयांमुळे मतदारांचे मनोरंजन झाले. सोमवारी (दि. १८) सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचार संपुष्टात आल्यानंतर आता जिल्ह्यावासीयांना मतदानाचे वेध लागले आहेत. भयमुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील चार हजार ९२६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने २४ हजार २२५ अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचारी नियुक्त असतील. त्यामध्ये मतदान केंद्र अध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई असेल. पथकाच्या सोबत एक पोलीस कर्मचारीही असेल. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महसूल यंत्रणा व पोलीस विभाग सतर्क असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!