सणासुदीच्या दिवसांतही अंबड, कामटवाडे परिसरात अजुनही कमी दाबाने पाणी…
नाशिक (प्रतिनिधी): मनपाकडून पाणी वितरणात मोठ्या त्रुटी असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्याची दखल अखेर आयुक्तांनी घेतली असून, अधिका-यांना ऑफिसमध्ये न बसता, तक्रार असलेल्या ठिकाणांनी भेटी देऊन तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील विविध भागांत अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना महापालिकेकडे तक्रारी करून पाठपुरावा करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मनपावर मोर्चेही येत आहेत.
आयुक्तांच्या निर्देशानंतर तरी अधिकारी खुर्च्या सोडून फिल्डवर जाणार, की, खुर्च्याच उबवत बसणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. सणासुदीच्या दिवसांतही अंबड, कामटवाडे परिसरात अजुनही कमी दाबाने पाणी येत असून बंद होण्याची वेळ ही लवकरच असल्याने अजूनही पाणीप्रश्नी नागरिक असंतुष्ट कळते. यंदा पाऊस चांगला झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर, दारणा व मुकणे ही तिन्ही धरणे तुडुंब भरली आहेत. मराठवाड्याला देखील जवळपास ४५ टीएमसीहून पाणी सोडले गेले असल्याने पुन्हा पाणी सोडण्याचा प्रश्न राहिलेला नाही. त्यामुळे या वर्षात पाण्याची चिंता राहिलेली नाही. मात्र, असे असतानाही ऐन पावसाळ्यात नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नाशिक महापालिकेवर महिनाभरात सहा मोर्चे काढून नागरिकांनी आंदोलन केले आहे. त्यात प्रभाग क्र. २८ मधील महिलांनी मोर्चातून आपला असंतोष दाखवून दिल्यानंतर मनपा प्रशासनाला याची दखल घेणे भाग पडले.