आयुर्वेदाच्या सुवर्णस्पर्शातून घडतेय उद्याचे सुदृढ भविष्य : गव्यसिद्ध मधुकर फडोळ

संस्कृती आर्य गुरुकुल व देवकीनंदन गोशाळेचा निःशुल्क सुवर्णप्राशन संस्कार उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी

माधुरी वाघ, नाशिक : आजच्या आधुनिक जीवनशैलीत लहान मुलांचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक स्थैर्य आणि बौद्धिक विकास यावर अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. मोबाईल, टीव्ही, फास्ट फूड आणि वाढता ताणतणाव याचा थेट परिणाम बालकांच्या आरोग्यावर होताना दिसतो. अशा परिस्थितीत आयुर्वेदाच्या हजारो वर्षांच्या परंपरेतून आलेला सुवर्णप्राशन संस्कार हा मुलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. हाच विचार प्रत्यक्षात उतरवत संस्कृती आर्य गुरुकुलम, राजकोट व देवकीनंदन गोशाळेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, गव्यसिद्ध असलेले मधुकर हरिभाऊ फडोळ हे गेल्या अनेक वर्षांपासून सहा महिन्यांपासून ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना आयुर्वेदिक पद्धतीने मंत्रौषधी सुवर्णप्राशन देत आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण उपक्रम पूर्णतः निःशुल्क असून, कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय सर्वसामान्य कुटुंबांतील मुले याचा लाभ घेत आहेत.
पालकांचा वाढता विश्वास, सहभागात लक्षणीय वाढ: सुरुवातीला मोजक्याच पालकांचा सहभाग असलेला हा उपक्रम आता मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. सध्या पालक कोणतीही शंका किंवा संकोच न ठेवता आपल्या मुलांना सुवर्णप्राशन संस्कार शिबिरात सहभागी करून घेताना दिसत आहेत. दर महिन्याला होणाऱ्या शिबिरांमध्ये शेकडो बालकांची उपस्थिती हे या उपक्रमावरील वाढत्या विश्वासाचेच द्योतक आहे. पालकांच्या मते, सुवर्णप्राशन घेतल्यानंतर मुलांमध्ये आजारांचे प्रमाण कमी झाले असून, एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वासात सकारात्मक बदल जाणवत आहेत. यामुळे हा उपक्रम केवळ धार्मिक किंवा पारंपरिक न राहता, वैज्ञानिक आणि आरोग्यदृष्ट्या उपयुक्त ठरत आहे.
कश्यप संहितेतील प्राचीन ज्ञानाची आधुनिक काळात अंमलबजावणी : आयुर्वेदातील सर्वात प्राचीन व बालरोगांवर आधारित ग्रंथ कश्यप संहिता मध्ये सुवर्णप्राशनाची निर्मिती विधी सविस्तरपणे वर्णन करण्यात आली आहे. त्याच शास्त्रोक्त पद्धतीनुसार दर महिन्याला पुष्प नक्षत्राच्या शुभ तिथीला, वैदिक मंत्रोच्चारांच्या सान्निध्यात, सात्विक व पवित्र वातावरणात सुवर्णप्राशन तयार करण्यात येते. हे सुवर्णप्राशन सुवर्ण भस्म, ब्राह्मी, वचा, नवरत्न, पिंपळी (पिपर) आणि शुद्ध मध यांच्या योग्य प्रमाणातील संयोजनातून सिद्ध केले जाते. प्रत्येक घटकाचा स्वतंत्र आयुर्वेदिक गुणधर्म असून, एकत्रितपणे हे प्राशन बालकांच्या शरीरावर आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम करते.

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी,
तज्ज्ञांच्या मते, सुवर्णप्राशनामुळे
▪ मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते
▪ वारंवार होणारे सर्दी, ताप, खोकला यांचे प्रमाण कमी होते
▪ मेंदूचा विकास होऊन स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते
▪ बोलण्याची, ऐकण्याची व शिकण्याची क्षमता विकसित होते
▪ मानसिक स्थैर्य व आत्मविश्वास वाढीस लागतो

यामुळे सुवर्णप्राशन हा केवळ एक औषधी उपाय न राहता, बालसंस्काराची प्रभावी प्रक्रिया ठरत आहे.

मुलं हे देशाचे भविष्य” – सामाजिक जाणिवेतून उपक्रम

मुलं हे देशाचे भविष्य आहेत. त्यांना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवणे ही आपली जबाबदारी आहे. आयुर्वेदिक परंपरेतून त्यांना निरोगी व तेजस्वी घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन मधुकर हरिभाऊ फडोळ यांनी केले. संस्कृती आर्य गुरुकुल व देवकीनंदन गोशाळेच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजात आयुर्वेदाबाबत जागरूकता निर्माण करत असून, आधुनिकतेच्या झगमगाटात हरवलेले पारंपरिक आरोग्यज्ञान पुन्हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहे.

समाजासाठी अनुकरणीय उपक्रम : आज आरोग्य सेवांचे व्यापारीकरण वाढत असताना, निःशुल्क सुवर्णप्राशन संस्कार हा उपक्रम समाजासाठी आदर्श ठरत आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व मुलांसाठी खुला असलेला हा उपक्रम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे. अधिकाधिक पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्कृती आर्य गुरुकुल व देवकीनंदन गोशाळेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!