नाशिक (प्रतिनिधी): संशयिताने व्यावसायिकाचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट ओळखपत्रे दाखवून रेल्वेचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली असून, संशयिताने पीडित व्यावसायिकास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणीही केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. रेल्वेचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची एका तोतया आयपीएस अधिका-याने तब्बल एक कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल सखाराम वाकडे (वय ५६, वसंतनगर, राणेनगर) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित गौरव रामअवतार मिश्रा (वय ३७, रा. मिश्रा हाउस, महालक्ष्मीनगर) याने २०१८ मध्ये त्यांच्याशी ओळख करून मिश्रा हा स्वत:ला भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असल्याचे भासवत होता. तो नेहमी पोलीस गणवेश परिधान करून, लाल-निळ्या दिव्यांच्या गाडीतून फिरत असे. त्याने आपल्याकडे शासनाने दिलेले सुरक्षा रक्षक असल्याचे दाखवून वाकडे यांचा विश्वास संपादन केला, तसेच मिश्रा याने वाकडे यांना रेल्वेचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. वाकडे यांनी मिश्रा याच्या विश्वासाने त्याला एकूण १ कोटी ७ लाख ८८ हजार १०६ रुपयांची रक्कम दिली. यामध्ये रेल्वे डेपो येथे गाड्यांचा पुरवठा, सिक्युरिटी डिपॉझिट, गाड्यांचा खर्च अशा विविध कारणांसाठी पैसे देण्यात आले. मात्र, कालांतराने वाकडे यांना मिश्राच्या तोतयागिरीची जाणीव झाली. त्यांनी मिश्राकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता तो त्यांना टाळाटाळ करू लागला. १३ ऑक्टोंबर २०२४ रोजी मिश्राने वाकडे यांना पाथर्डी फाटा येथे भेटण्यासाठी बोलावले. तेथे १० ते १२ गुंडांना सोबत घेऊन आलेल्या मिश्राने वाकडे यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकी दिली. त्याने वाकडे यांना पैसे विसरून जाण्यास सांगितले, तसेच त्यांच्याकडून दरमहा ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. याचदरम्यान वाकडे यांना इंदिरानगर पोलीस ठाण्यात मिश्रा याच्याविरुद्ध तोतयागिरीचा गुन्हा दाखल असल्याचीही माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी धाडस करीत अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मिश्रा याच्याविरुद्ध खंडणी, धमकी आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
