नाशिक (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा बुधवारी (दि.२) स्वच्छता दिवसाने समारोप करण्यात आला. यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिंडोरी तालुक्यात खा- भास्कर भगरे, सिन्नर तालुक्यात खा- राजाभाऊ वाजे, निफाड तालुक्यात आ- दिलीप बनकर यांनी स्वच्छता दिवस मोहिमेत सहभाग घेतला.
स्वच्छता ही सेवा अंतर्गत दि.२ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता दिवस साजरा करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यात स्वच्छता शपथ, वृक्ष लागवड, स्वच्छ भारत अभियानाच्या विविध कामांचे उद्घाटन, भूमिपूजन, श्रमदान मोहीम, तसेच स्वच्छ माझे अंगण स्पर्धेतील सहभागींना प्रमाणपत्राचे वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले.
‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत ग्रामपंचायत तळेगाव दिंडोरी (ता. दिंडोरी) येथे खा. भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन केंद्राचे, तसेच कचरा वर्गीकरण शेडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, गटविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.