गणेशोत्सव विशेष उत्साहात “आला आला गणराज आला”

नाशिक (प्रतिनिधी) : गुलालाची उधळण, ढोल ताशाचा गजर, फुलांचा वर्षाव, तर कुठे बॅन्जो पथक अन् फटाक्यांची आतषबाजी करीत लाडक्या गणरायाचे घरोघरी जल्लोषात स्वागत करण्यात आले. गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण, गणपती अष्टोत्तर नामावली यासह मंत्रोच्चार आणि मंगलमय वातावरणात घरोघरी, तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिवसभरात अधूनमधून पावसाने हजेरी लावत बाप्पाचे स्वागत केले.

ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत चैतन्यपर्वास प्रारंभ झाला. गणेशमूर्ती, पुजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, प्रसाद खरेदीसाठी बाजारात दिवसभर गर्दी दिसून आली. तसेच दर्शनासाठी
शहरातील गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान, बाप्पाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट बघत असल्याने स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. शहरासह उपनगरांमध्येही गणेशोत्सवाचा विशेष उत्साह बघायला मिळाला. गणपतीची प्रतिष्ठापना करताना आवश्यक असलेल्या पूजा साहित्याच्या विक्रीची दुकाने ठिकठिकाणी थाटली होती. पूजा साहित्याप्रमाणेच तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या गणेश मूर्ती विक्री स्टॉल्समध्येही विविध प्रकारच्या गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. पूजा साहित्य, सजावट साहित्य खरेदीसाठी, तसेच मिठाईच्या दुकानांमध्ये मोदक, पेढे, लाडू, तसेच इतर मिठाई खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी दिसून आली. सार्वजनिक गणेश मंडळे, विविध हौसिंग सोसायटी, तसेच अनेक औद्योगिक कंपन्या, शासकीय – निमशासकीय, तसेच खासगी आस्थापनांमधील सदस्यांचाही गणेशाची प्रतिष्ठापना करताना विशेष उत्साह दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!