अंतापुर येथील बँक मित्राच्या घरी लाखोंची रोकड लंपास करत चोरट्यांचा दरोडा!

तुषार रौंदळ,

सटाणा (प्रतिनिधी) : बागलाण तालुक्यातील अंतापुर गावात घडलेल्या धाडसी घरफोडीने शांत वातावरण हादरून गेले. अनिल पुंडलिक जाधव यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. ही घटना जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

प्राप्त माहितीनुसार, जाधव दाम्पत्य एका नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारासाठी सिन्नर येथे गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी पोस्ट ऑफिसच्या परिसरात असलेल्या त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे, पेट्या आणि इतर साहित्याची तोडफोड करून चोरट्यांनी संपूर्ण घर उध्वस्त केले. कल्पना जाधव या बँक ऑफ बडोदामध्ये ‘बँक मित्र’ म्हणून कार्यरत असल्याने ग्राहकांना देण्यासाठी ठेवलेली काही रक्कमही चोरीस गेली. सोने–चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून एकूण चोरीचा मुद्देमाल तीन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, घराजवळ राहणारे नातेवाईक विजय पगारे यांना घराचा तुटलेला कडीकोयंडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसले आणि चोरी झाल्याची खात्री झाली. पगारे यांनी तत्काळ जाधव दाम्पत्यांना तसेच पोलिसपाटील संजय खैरनार यांना माहिती दिली. माहिती मिळताच जायखेडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा सुरू केला. तपासाला गती देण्यासाठी श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना बोलाविण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत बाविस्कर यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप चेडे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!