नाशिक (प्रतिनिधी): स्पर्धेत तनिशा ही सांघिक स्पर्धेबरोबरच वैयक्तिक, दुहेरीत अंकुर भट्टाचार्य (पीएसपीबी) आणि मिश्र दुहेरीत सिंड्रेला दास (पश्चिम बंगाल) यांच्या साथीने खेळणार आहे. भारताकडून तिन्ही प्रकारांत खेळणारी महाराष्ट्रातील ती एकमेव खेळाडू आहे. या संघात पुण्याच्या पृथा वर्टीकर व नायशा रेवासकर यांचाही समावेश आहे, तसेच १५ वर्षांखालील मुलींच्या संघात टीएसटीए मुंबईच्या दिव्यांशी भौतिक हिचा समावेश आहे. तिच्या या निवडीबद्दल नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, जय मोडक, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण लुंकड, सरचिटणीस यतिन टिपणीस, महेंद्र चिपळूणकर, संजय कडू, पुनीत देसाई आदींनी अभिनंदन केले आहे. रोमानिया येथे आयोजित जागतिक यूथ टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकची टेबल टेनिसपटू तनिशा कोटेचा हिची १९ वर्षांखालील मुलींच्या भारतीय संघात निवड झाली आहे. इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनच्या वतीने २३ ते ३० नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. तनिशाच्या कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
तनिशाने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर धडक दिली आहे. यापूर्वी तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर जॉर्जियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत १९ व १७ वर्षांखालील दोन्ही वयोगटांत रौप्यपदके पटकावली आहेत. उझबेकिस्तानमध्ये झालेल्या आशियाई युवा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंकुर भट्टाचार्य यांच्यासोबत कांस्यपदक जिंकले. खेलो इंडिया यूथ गेम्स या स्पर्धेत तिने मुलींच्या एकेरीत सुवर्णपदक आणि दुहेरीत रौप्यपदक जिंकले. तिची जागतिक विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेसाठी भारतीय विद्यापीठ संघात निवड झाली आहे, ज्यामुळे तिला रोमानियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
