नाशिक (प्रतिनिधी): सहकारी संस्थाच्या बाबत आयकर कायद्यात नव-नवीन बदल होत आहेत मुख्यतः २०१८ नंतरच्या काळात काही महत्वपूर्ण दुरुस्ती वजा बदल करण्यात आले आहे. या नियमांना अनुसरूनच कामकाज करणे व वेळेत रिटर्न दाखल बंधन कारक आहे तरच तुम्ही घेतलेल्या वजावटी चा फायदा घेता येईल अन्यथा आयकर खात्याच्या नोटिशीला सामोरे जावे लागू शकते अशी माहिती नाशिक येथील जेष्ठ कर कायदेतज्ञ भूषण डागा यांनी दिली.
राज्यातील प्रमाणित लेखापरिक्षकांसाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र ऑडिटर वेल्फेअर असो. व नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असो. यांच्या संयुक्त विद्यमाने “सहकारी संस्था व आयकर कायद्यातील तरतुदी” याविषयी मार्गदर्शनपर ऑनलाईन परिसवांदाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी सहकारी संस्थेच्या लेखापरिक्षक, कर सल्लागार यांनी सहकार कायद्यासोबतच सहकारी संस्थांना आवश्यक व अनिर्वार्य झालेल्या विविध तत्सम कायद्याबाबत अद्यावत असणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सहकारी संस्थेला आयकर कायद्यानुसार दाखल करावी लागणारी विवरणपत्रके, टीडीएस बाबतचे नियम तसेच आयकर व जीएसटी कायद्या संदर्भातील जबाबदाऱ्या याबाबत त्यांनी उपस्थितांना अवगत करून दिले.
सहकारी संस्थांना, आयकर विभागाकडून मोठ्या प्रमाणावर नोटिसा येत असून, बहुतांश प्रकरणांमध्ये आयकर विभागाने सहकारी संस्था, पतसंस्थांना कलम ८०पी नुसारच्या वजावटी अमान्य केल्याचे दिसून येत आहे. यामागीची करणे, आयकर कायद्यातील तरतुदी व नोटिसा कशा पद्धतीने हाताळाव्या याबाबत सर्व स्तरावर आयकर कायद्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सदरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिर्के व श्री संदीप नगरकर यांनी केले. वक्त्यांचा परिचय नितिन डोंगरे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन संजयजी घोलप यांनी केले. चर्चासत्राचे यशस्वीरीत्या आयोजना साठी नितीन डोंगरे, योगेश कातकाडे, ऍड.सतीश कजवाडकर, उमेश देवकर, श्रीकांत चौगुले, धनंजय शेळके, भास्कर वाकोडे यांचे योगदान लाभले.या चर्चासत्रासाठी अहमदनगर, नाशिक, पुणे, मालेगाव, जळगाव, संभाजी नगर, परभणी, नांदेड, नागपूर असे राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रमाणित लेखापरीक्षक तसेच कर सल्लागार उपस्थित होते.
प्रारंभी ऑडिटर कौन्सिलचे अध्यक्ष रामदास शिर्के यांनी सदर चर्चासत्राचा उद्देश तसेच राज्यातील ऑडिटर वेल्फेअर कौन्सिलच्या आजवरच्या कार्याची माहिती दिली. प्रथम सत्रात पुणे येथील पोलीस कारागृह विभागात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ भाग्यश्री साळुंखे यांनी उपस्थितांना माणसाच्या जीवनात निर्माण होणारे सध्याचे “ताण-तणाव व त्याचे निराकरण” या विषयावर मार्गदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.