नाशिक (प्रतिनिधी): मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अभ्यास मंडळाने दिल्ली येथील मॉडेल स्कूलचा अभ्यास दौरा केला. दिल्लीच्या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या शाळांचा विकास करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह मनपा आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
गेल्या दि. ११ ते १५ डिसेंबर यादरम्यान शिक्षण विभागाचे अभ्यास मंडळ दिल्लीच्या दौºयावर गेले होते. या अभ्यास दौºयात दिल्ली येथील राजकीय सर्वोदय बालसदन, डॉ. बी. आर. आंबेडकर स्कूल आॅफ एक्सलन्स, दिल्ली व्हर्चुअल स्कूल अशा शाळांना भेटी देऊन तेथील शिक्षण पद्धती, तेथे पुरविल्या जाणाºया भौतिक सुविधा, पालकांचा सहभाग, शिक्षकांना दिले जाणारे प्रशिक्षण, मुख्याध्यापकांचे सक्षमीकरण, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी राबविले जाणारे सहशालेय उपक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सहभाग, शालेय वेळ, त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्ययन-अध्यापनामध्ये प्रभावी वापर कसा केला जातो, याबरोबरच तंत्रस्नेही शिक्षकांचा सहभाग अशा विविध प्रकारची माहिती घेण्यात आली.
अभ्यास दौºयात शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्ली येथील शिक्षण उपसंचालक सी. एस. वर्मा यांची भेट घेऊन नाशिक महापालिकेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कोणकोणत्या पद्धती अवलंबल्या जाऊ शकतात, याबाबत सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर दिल्ली मॉडेल स्कूलमध्ये सुरुवातीला कोणकोणत्या अडीअडचणी आल्या आणि त्यावर कोणते उपाय काढण्यात आले याविषयी सुद्धा या दौ-यामध्ये चर्चा करण्यात आली.
शिष्टमंडळामध्ये शिक्षणाधिका-यांसह यूआरसी २ चे प्रमुख बाळासाहेब कडलग, यूआरसी १ चे प्रमुख सुनील खेलुकर, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा राज्य पुरस्कारप्राप्त शाळेचे केंद्रप्रमुख ईश्वर चव्हाण, जिल्हा पुरस्कारप्राप्त शाळेचे केंद्रप्रमुख प्रकाश शेवाळे यांचा सहभाग होता. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधा व त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे राबविले जाणारे उपक्रम याचीही माहिती घेण्यात आली.