मालेगाव (प्रतिनिधी): शहरातील इस्लामपुरा भागात मिळकतीचा पोटहिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांचे नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून देण्याकरिता तब्बल दहा लाखांची लाच स्वीकारताना नगरभूमापन अधिकारी पंढरीनाथ चौधरी यांना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले. या घटनेने मालेगाव शहरात सर्वत्र खळबळ उडाली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
एसीबीच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरात सोमवारी दि. १६ रोजी धुळे येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी भूमापन विभागाचे अधिकारी संशयित पंढरीनाथ काळू चौधरी (वय ५०, रा. नाशिक) यांच्यासह अन्य एक साथीदार संशयित अन्सारी मेहमूद अहमद मोहम्मद शफी (वय ७२, रा. मालेगाव) याला पथकाने ताब्यात घेतले आहे.
मालेगाव शहरातील तक्रारदार व इतर सहधारक यांच्या नावे इस्लामपुरा येथे भूखंड आहे. त्याचा पोटहिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांचे नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून देण्याकरिता नगरभूमापन विभागाचे वर्ग दोन पदावरील अधिकारी पंढरीनाथ चौधरी यांनी त्यांच्या सहकाºयाच्या मदतीने दहा लाखांची लाचेची मागणी होती. याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचून पंढरीनाथ चौधरी यांच्यासह साथीदारास पंचांसमक्ष केली अटक केली आहे. धुळे येथील लाचलुचपत विभागाचे परिवेक्षण अधिकरी सचिन साळुंखे यांच्यासह पोलीस हवालदार राजन कदम, पावरा, सुधीर मोरे, रामदास बारेला आदींनी ही कारवाई केली आहे.