गणेश मंडळांना दिलासा: मनपाकडून परवाना शुल्क माफ!

नाशिक (प्रतिनिधी): यंदाच्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना परवाना शुल्क माफ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात मनपाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मनपाने तत्काळ निर्णय घेतला.
सण, उत्सवांच्या काळात महापालिका हद्दीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात मंडप किंवा स्टेज तसेच, कमान उभारण्यासाठी दररोज सहा रुपये प्रति चौरस मीटर व कमीत कमी ७५ रुपये याप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळांकडून शुल्क आकारले जाते. १० दिवसांसाठी जवळपास साडेसातशे रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी याप्रमाणे विभागीय कार्यालयाकडे गणेश मंडळांना शुल्क भरावे लागते. त्यानंतरच मंडप, कमान, स्टेज उभारण्यासाठी मनपाकडून परवानगी दिली जाते. महापालिकेच्या जागेव्यतिरिक्त खासगी जागांमध्ये मंडप किंवा स्टेज उभारणी केल्यास त्यावर शुल्क आकारणी केली जात नाही. मात्र, खासगी जागेवर मंडप उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे मंडळांना बंधनकारक करण्यात आले आहे. मागील वर्षी देखील गणेश मंडळांना परवाना शुल्क माफ करण्यात आले होते. यंदाही कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी पालकमंत्र्यांच्या सुचनेनंतर शुल्क माफीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!