शहरातील भारतनगर, कस्तुरबानगर यादोन झोपडपट्ट्यांचा समावेश
नाशिक (प्रतिनीधी): महापालिकेने स्वमालकीच्या जागेवर असलेल्या शिवाजीवाडी नंदिनीनगर-भारतनगर आणि कस्तुरबानगर या दोन झोपडपट्ट्या अधिकृत करण्याची नोटीस जारी केली आहे. त्यासाठी मनपा प्रशासनाने नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या असून, त्याकरिता १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नागपूरच्या धर्तीवर मनपा हद्दीतील स्व:मालकी, तसेच शासकीय जागांवर असलेल्या झोपडपट्टीधारकांना भाडेपट्ट्यांवर जागा, तसेच हक्काची घरे बांधण्यास परवानगी देण्याबाबत शासनाने आदेशित केले आहे. मात्र, अद्याप नाशिक मनपाकडून त्याबाबत कोणतीही कार्यवाही होऊ शकलेली नाही. नाशिक शहरात सध्या एकूण १५९ झोपडपट्ट्या आहेत. यातील ५५ अधिकृत, तर १०४ झोपडपट्ट्या अनधिकृत आहेत. यासंदर्भात महापालिकेने २००६ मध्ये सर्वेक्षण केले होते. शहराचा वाढता विस्तार पाहता गेल्या काही वर्षांपासून झोपडपट्ट्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते.
सन २००६ मध्ये शहरात झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण केले. शहरातील ८२ झोपडपट्ट्या या खाजगी जागेवर तर महापालिकेच्या जागेवर सहा आणि शासकीय जागांवर १६ झोपडपट्ट्या असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरासह परिसरात अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या वत्सल्या आहेत. मात्र, २००६ नंतर महापालिकेने पुन्हा सर्वेक्षण केले नाही. त्यामुळे आजमितीस एकूण झोपडपट्ट्या किती, याची अधिकृत आकडेवारी महापालिकेकडे नाही. ऑगस्ट २०२३ मध्ये विधानसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना नगरविकास विभागाने शहरातील अघोषित झोपडपट्ट्यांचे संरक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंत्रालयातील बैठकीत नागपूरच्या धर्तीवर नाशिकमधील झोपडपट्टीधारकांना भाडेपट्टी लागू करण्यास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. शासकीय जागांवरील झोपडपट्ट्या घोषित असल्याचे समजून कारवाई करण्याच्या सूचना नगरविकास विभागाकडून दिल्या गेल्या; मात्र, अद्याप त्याबाबत कार्यवाही होऊ शकलेली नाही. या अनुषंगाने नाशिक मनपा प्रशासनाने शहरातील दोन झोपडपट्ट्या अधिकृत करण्यासंदर्भात जाहीर नोटीस प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत.
