निफाड, दिंडोरी, चांदवड, देवळा तालुक्यात जनजागृती कार्यक्रम संपन्न…
ओझर (प्रतिनिधी): १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात आलेल्या वन्यजीव सप्ताह च्या निमित्ताने जिल्हा भरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात बिबट संवेदनशील गावांमध्ये विशेष जनजागृती करण्यात आली. नाशिक पुर्व वनविभाग व ए.आर.ई.ए.एस.फाउंडेशन संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने मानव बिबट सहजीवन मोटारसायकल रॅली, शून्य सर्पदंश जनजागृती अभियान, चित्रकला, निबंध स्पर्धा, अरण्य वाचन असे विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली.
नाशिक जिल्ह्याची बिबट प्रवण जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यात अनेक वेळा बिबट प्राण्याने मनुष्य वस्ती जवळ येऊन हल्ला करण्याच्या घटना घडलेल्या आहेत.यात अनेकांना आपले प्राण मुकावे लागले आहेत. यातूनच नाशिक जिल्ह्यात वन्यजीव मानव संघर्ष वाढत असतांना दिसतोय. हा संघर्ष टाळण्यासाठी नाशिक पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड, दिंडोरी, चांदवड, देवळा तालुक्यातील बिबट संवेदनशील गावांमधील नागरिकांमध्ये व भविष्यातील नागरिक म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून वन्यजीवांबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले. यात मुख्यता बिबट प्राण्या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
बिबट प्राण्यापासून स्वतः चे व जनावराचे रक्षण कसे करावे याबाबत धडे देण्यात आले. यासाठी डिजिटल स्क्रीन व्हॅन सारखे उपकरण वापरले गेले तर बिबट व वाघ प्राण्यांच्या प्रतिकृती दर्शवणारे ‘ बिट्टू’ व ‘शेरू’ हे सोंगाडे असलेली संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक भावली. गावं शाळा मध्ये वन्यजीवा बाबतीतील माहिती पत्रके वाटप करण्यात आली. चित्रकला व निबंध स्पर्धेतून विदयार्थ्यांनी वन्यजीवा च्या बाबतीत मांडलेले विचार स्पष्ट झाले.मानव बिबट सहजीवन जनजागृती मोटारसायकल रॅली द्वारे कमी वेळात अधिक गावात जनजागृती करण्यात आली. यात नाशिक पुर्व वनविभागाचे, येवला, दिंडोरी, चांदवड, देवळा वनपरीक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, निफाड व येवला येथील आधुनिक बचाव पथक कर्मचारी, ए.आर.ई.ए.एस.फाउंडेशन संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथील प्राणी शास्त्र विभाग प्रमुख त्यांचे प्राध्यापक व विद्यार्थी, विद्यार्थिनी, सिडको महाविद्यालय प्राध्यापिका व विद्यार्थिनी, नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य मधील वन अधिकारी, कर्मचारी, पक्षीमित्र, गाईड,सिन्नर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने तील शिक्षक व विद्यार्थी, जिल्ह्यातील सर्परक्षक, के व्ही एन नाईक संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी मधील प्राध्यापक विद्यालयाचे नेचर क्लब मधील विद्यार्थी,प्राणीमित्र, निसर्गमित्र,वन्यजीव छायाचित्रकार, पक्षीतज्ज्ञ वन्य पशु पक्षी सामाजिक संरक्षण संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, ह्यूमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन संघटनेचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला. याकामी रमेश अय्यर, गिव्ह वेल्फेअर असोसिएशन,सौ. मायावती विजय सदाफळ सरपंच खेडलेझुंगे,शाम सिल्क अँड साडीज, नाशिक टेक्सस्टाईल मार्केट,ओझर मिग संतोष डी. पीठे,ओझर मिग, विकास शिंगाडे मालेगाव,सागर खैरनार वटार सटाणा, संजय पगारे ओझर मिग, अनंत (बाळा) सरोदे नाशिक, कौसर पिंजारी, नाशिक यांचे सहकार्य लाभले.
वन्यजीव सप्ताह कार्यक्रम
१ ऑक्टोबर :- निफाड तालुका मानव बिबट सहजीवन जनजागृती मोटारसायकल रॅली
रॅली मार्ग :- निफाड वन उद्यान, नैताळे, धारणगावं खडक, धारणगावं वीर, खेडलेझुंगे,खाणगाव थडी, नांदूरमधमेश्वर, निफाड वन उद्यान.
२ ऑक्टोबर :- निबंध स्पर्धा
३ ऑक्टोबर :- चित्रकला स्पर्धा
४ ऑक्टोबर :- दिंडोरी तालुका मानव बिबट सहजीवन जनजागृती मोटरसायकल रॅली
रॅलीचा मार्ग :-निळवंडी ग्रामपंचायत, लखमापूर जनता विद्यालय, परमोरी ग्रामपंचायत, पालखेड बंधारा प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, कोराटे ग्रामपंचायत, के आर टी विद्यालय मोहाडी, प्राथमिक विद्यामंदिर वनारवाडी
५ ऑक्टोबर :- शून्य सर्पदंश जनजागृती व मानव बिबट सहजीवन जनजागृती अभियान. अभिनव शाळा देवळा, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय लोहनेर, नेमनाथ जैन महाविद्यालय, चांदवड.
७ ऑक्टोबर :- अरण्य वाचन, निफाड वन उद्यान. शून्य सर्पदंश जनजागृती व मानव बिबट सहजीवन जनजागृती अभियान श्रीराम विद्यालय रायपूर ता. चांदवड.