नाशिक ग्रामीण भागात मुसळधार पाऊस तर शहर दमदार पावसाच्या प्रतिक्षेत!

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात चांदवड, येवला, नांदगाव, निफाड तालुक्यात मंगळवारी (दि. ११) विजांचा कडकडाट आणि वादळी
वा-यासह मृग नक्षत्राचा दमदार पाऊस पडला. पावसामुळे बळीराजा सुखावला असून अनेक ठिकाणी पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. दरम्यान, वीज कोसळून आणि वादळी वा-यांमुळे नुकसान देखील झाले आहे. वीज पडल्याने खादगाव (ता. नांदगाव) येथील विलास जंगलू गायकवाड (वय २९) या तरुणाचा तर चांदवड तालुक्यात दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.
दुष्काळात होरपळत असलेल्या चांदवड, येवला आणि नांदगाव तालुक्यात मंगळवारी मुसळधार पाऊस बरसला. चांदवड शहर परिसरासह तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला. त्यामुळे द्राक्षबागेसह झाडे उन्मळून पडली. मृग नक्षत्रातील पहिल्याच टप्प्यात मालेगाव, चांदवड, निफाड, नांदगाव या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. चांदवड तालुक्यात पाझर तलाव ओसंडून वाहिले. दरम्यान, नाशिक शहरासह अनेक तालुक्यांमध्ये अद्याप दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!